Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक रोड स्थानकात 'होल्डिंग एरिया'
esakal July 03, 2025 07:45 PM

नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. तसेच देशातील एकूण ७३ रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याने आगामी कुंभमेळ्यात रेल्वेस्थानकात गर्दी व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे.

२०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी पाच कोटींहून अधिक भाविक येतील, असा अंदाज आहे. मध्य रेल्वेमार्गावरील नाशिक रोड एनएसजी-२ श्रेणीतील रेल्वेस्थानक असून, दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी येथे येतात. कुंभमेळ्यात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सण-उत्सवकाळात गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रवाशांना ट्रेन येईपर्यंत स्थानकाबाहेरील प्रतीक्षास्थळांवर थांबविले जाते. फक्त आरक्षित तिकीटधारकांनाच फलाटावर प्रवेश दिला जातो. १६ फेब्रुवारी २०२५ ला नवी दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ७ मार्च २०२५ ला झालेल्या बैठकीत, गर्दी नियंत्रणासाठी देशातील ६० प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे.

त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ ला रेल्वेमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात, स्थानिक आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने नाशिक रोड स्थानकाचा पुनर्विकास आणि मल्टीमोडल हब तयार करण्याचे निर्देश दिले. रेल्वे मंत्रालयाने नाशिक रोड स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर केला. यामध्ये तळघर व त्यावर दोनमजली इमारतीचा समावेश आहे. त्याचबरोबर होल्डिंग एरियाची मंजुरी दिल्यास अतिरिक्त खर्च वाचून रेल्वेच्या सुविधांचा उत्तम वापर होईल, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती.

त्या अनुषंगाने नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाला मंजुरी देण्यासाठी मार्च २०२५ रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांना मंत्री भुजबळ यांनी पत्र लिहिले होते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाकडून कुंभमेळा नियोजनांतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानकात होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता दिली. तसेच देशातील ७३ रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचा समावेशदेखील करण्यात आला आहे.

नाशिक रोड स्थानकात वॉररूम

गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ७३ स्थानकांवर प्राधान्याने विविध कामे व उपाययोजनादेखील केल्या जाणार आहेत. यात गर्दीला स्थानकाबाहेर थांबविण्यासाठी प्रतीक्षास्थळांची निर्मिती केली जाणार आहे. अनधिकृत प्रवेश बंद, बॅरिकेडिंग करून फक्त आरक्षित तिकीटधारकांनाच थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे.

Patanjali: रामदेव बाबांना हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा प्रवाह पुढील व मागील भागांमध्ये समप्रमाणात विभागणे, १२ मीटर व ६ मीटर रुंदीचे नवीन डिझाइनचे फुटओव्हर ब्रिजेस निर्माण करणे, स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवून एकत्रित ‘वॉर रूम’मधून देखरेख करणे, संपर्कासाठी वॉकी-टॉकी, घोषणाप्रणाली, कॉलिंग सिस्टिम इत्यादी डिजिटल उपकरणे, अधिकृत रेल्वे व ठेकेदार कर्मचाऱ्यांसाठी आरपीएफच्या मंजुरीनुसार नवीन ओळखपत्रे देणे, आपत्कालीन परिस्थितीत ओळख सुलभ व्हावी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश असणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.