गेली काही वर्षे सुरु असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा टीआरपी अचानक कमी झाल्यामुळे, सूत्रसंचालक नीलेश साबळे याला डच्चू देण्यात आलेला आहे. अशी बातमी माध्यमांमध्ये येताच, प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली. त्यातच या चर्चेवर राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी नीलेशला चांगलेच खडे बोल सुनावले होते. शरद उपाध्ये यांच्या पत्रावर आता निलेश साबळे याने मौन सोडले असून, त्यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.
पत्राच्या माध्यमातून शरद उपाध्ये यांनी त्यांना सेटवर बराच वेळ बसवण्यात आले होते. तसेच त्यांची साधी पाण्याची विचारपूसही कोणी केली नव्हती. तसेच सेटवर त्यांना देण्यात आलेली वागणूकही फार विचित्र असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले होते. यावर निलेश साबळे म्हणाला की, त्याला चला हवा येऊ द्या -2 या कार्यक्रमामधून काढण्यात आलेले नाही. तर त्याला पुन्हा या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलेलं आहे. परंतु चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे, तारखा उपलब्ध नसल्याने त्याने स्वतः माघार घेतल्याचे त्याने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं.
शरद उपाध्ये यांनी त्यांच्या व्हायरल पोस्टमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर त्यांना कुणी पाणीही विचारले नाही असे म्हटले होते. सेटवर पाणी मिळाले नाही या शरद उपाध्येंच्या आरोपावर निलेश साबळे म्हणाला, प्रत्येकाच्या मेकअप रुममध्ये पाण्याची बाटली असते. त्यामुळे पाणी विचारणे वैयक्तिक जबाबदारी माझी नव्हती. मी कायमच माझ्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींच्या तसेच कलाकारांच्या मेकअप रूममध्ये जाऊन त्यांना भेटतो आणि पायाही पडतो. आपल्याबाबतीतही मी तेच केले होते. याला वैजयंती आपटे मॅडम साक्षीदार आहेत. असे म्हणत निलेश साबळे याने शरद उपाध्ये यांनी केलेले सर्व आरोप खोडून लावत त्यांना व्हिडीओमार्फत सडेतोड उत्तर दिले आहे.
यावर अधिक व्यक्त होताना निलेश साबळे म्हणाला, “शरद उपाध्ये सर, माझ्याकडे तुमचा नंबर आहे, असं असतानाही तुम्हाला सोशल मीडियावरच व्यक्त व्हायचं होतं.” तसेच या विषयावर अधिक बोलताना तो म्हणाला, “झी मराठी’ने मला डच्चू दिला, हे असे बोलताना आपण जबाबदारीची जाणीव ठेवून बोलायला हवे होते. आपण मोठे गुरुतुल्य व्यक्ती आहात. किमान ही पोस्ट लिहिताना आपण थोडी माहिती घ्यायला हवी होती. किमान मला डच्चू दिला ही बातमी खरी आहे की खोटी याची खातरजमा, तुम्ही ‘झी मराठी’च्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारू शकला असता.”