Kolhapur News – संतापजनक! भरपावसात रुग्णालयाबाहेर मृतदेह उघड्यावरच; वैद्यकीय शिक्षण मंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच धक्कादायक प्रकार
Marathi July 04, 2025 01:26 AM

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील शवागृहाच्याबाहेर भरपावसात एका मृतदेहची हेळसांड झाल्याचा गंभीर व संवेदनशील प्रकार समोर आला. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या जिल्ह्यातच घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होताच वैद्यकीय अधीक्षकांकडून यावर सारवासारव करण्यात आली.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच असलेल्या शवागृहा समोर स्ट्रेचरवर कापडात गुंडाळलेला एक मृतदेह बराच वेळ बाहेर ठेवण्यात आला होता. सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे सुमारे एक तासाहून अधिक काळ हा मृतदेह पावसात ठेऊन कर्मचारी गायब झाल्याचे पाहून, काहींनी मोबाईलवरून याचे चित्रे करण सुरू केले. याची कुण कुण लागल्यानंतर सीपीआर प्रशासन जागे झाले. गेटवरच कडेकोट सुरक्षारक्षक तैनात असताना सुद्धा त्यांचेही लक्ष या मृतदेहाकडे गेले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भर पावसातच हा मृतदेह बाजूला शववाहिकेच्या आडोशाला नेऊन ठेवला.

दरम्यान, मृतदेह पावसात असल्याची कबुली देत, वैद्यकीय कपड्याने बंदिस्त केला असल्याने, तो भिजला नाही. तसेच त्याची कसलीही हेळसांड झाली नसून याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र मदने यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.