अखेर समिती गठीत
esakal July 04, 2025 01:45 AM

अखेर समिती गठीत
वजनमाप प्रमाणपत्र मराठीत इंग्रजी प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : वैध मापन शास्त्र विभागामार्फत देण्यात येणारे परवाने व वजन माप पडताळणी प्रमाणपत्र अर्धे मराठी तर अर्धे इंग्रजीत देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य उपभोक्त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना अडचणी येत होत्या. त्यासंदर्भातील वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आता वैध मापनशास्त्र विभागाने यंत्रणेकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र, परवाने मराठीतून करण्याबाबत सहनियंत्रक, वैध मापन शाखा, नाशिक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
मराठी भाषेला ज्ञानभाषा व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण, बँक, विधी व न्याय व्यवहार, वित्त व उद्योग जगत प्रशासनात मराठी भाषेची अंमलबजावणी करण्यास देखील सुरुवात केली आहे. अनेक प्रशासकीय व्यवहारात मराठीचा वापर देखील करण्यात येत आहे.
दुसरीकडे वैधमापन शास्त्र विभागामार्फत देण्यात येणारे परवाना व वजन माप पडताळणी प्रमाणपत्रावरील उपभोगकर्त्याचे नाव व पत्ता वंज मापाचा तपशील इंग्रजी भाषेत देण्यात येत असतो. तसेच, वजन माप पडताळणी अर्ज करताना अनेक रकाने मराठी भाषेत असणे गरजेचे आहे. या विरोधात ठाणे वजन माप असोसिएशनच्या वतीने जानेवारी २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना निवेदन देत, वजन माप पडताळणी प्रमाणपत्र पूर्णत: मराठीत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी देखील स्मरणपत्र शासनाला देण्यात आले. मात्र, त्यावर शासनाकडून अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच आता, वैध मापनशास्त्र यंत्रणेकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र, परवाने मराठीतून करण्याबाबत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवांशी संबंधीत अर्ज, सेवेतर देण्यात येणारे परवाने, प्रमाणपत्र मराठीत करण्यासाठी या कार्यालयाच्या आदेशाव्दारे सहनियंत्रक, वैध मापन शाख, नाशिक विभाग यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आले असल्याची माहिती ठाणे वजन माप असोसिएशनने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.