IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम
esakal July 04, 2025 02:45 AM

India vs England 2nd Test Live Updates in Marathi Cricket News : इंग्लंड घरच्या मैदानावर रडकुंडीला आलेले पाहायला मिळाले... शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने एडबॅस्टन कसोटीत यजमानांना सडेतोड उत्तर दिले. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताकडून असा खेळ पाहायला मिळेल, याची अपेक्षा इंग्लंडनेही केली नव्हती. पण, यशस्वी जैस्वालच्या आक्रमक सुरुवातीनंतर गिलने झळकावलेले द्विशतक ऐतिहासिक ठरले.

यशस्वी जैस्वालने ८७ धावांची खेळी केल्यानंतर लोकेश राहुल ( २), करुण नायर ( ३१) आणि रिषभ पंत ( २५) हे अपयशी ठरले. पण, यशस्वी व शुभमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी मजबूत भागीदारी केली. त्यानंतर शुभमन व रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी २०३ धावा जोडून संघाला मजबूत स्थितीत आणले. जडेजा १३७ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८९ धावांवर बाद झाला. शुभमनने गिअऱ बदलताना द्विशतक झळकावले आणि इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. ( शुभमन गिलचे द्विशतक अन् अनेक विक्रम - एका क्लिकवर)

Vaibhav Suryavanshi सह भारताच्या युवा संघाने केला १०० किलोमीटर प्रवास; काल मॅच जिंकली अन्... कारण वाचून वाटेल आश्चर्य

संघात अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही ताबडतोड फटकेबाजी करताना शुभमनसह सातव्या विकेटसाठी २३ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली. शुभमनने २२२ वी धाव घेताच इंग्लंडमधील भारतीय फलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी १९७९ मध्ये सुनील गावस्करांनी २२१ धावा केल्या होत्या. भारताचा कर्णधार म्हणूनही परदेशातील ही सर्वोत्तम खेळी ठरली. विराट कोहीलने २०१६ मध्ये अँटिग्वा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २०० धावा केल्या होत्या आणि तो विक्रम शुभमनने मोडला.

SENA देशांमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन हा पहिला आशियाई कर्णधार ठरला. त्याने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा १९३ धावांचा ( वि. इंग्लंड, लॉर्ड्स, २०११) विक्रम मोडला. शुभमन द्विशतकानंतर आणखी आक्रमक झाला आणि त्याने संघाला पाचशेपार पोहोचवले. १८ वर्षानंतर भारताने इंग्लंडमध्ये ५००+ धावा केल्या. शुभमनने यासह अडीचशे धावांचा टप्पाही ओलांडला. यासह SENA देशांमध्ये २५० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविड ( २३३ वि. ऑस्ट्रेलिया, एडिलेड, २००३) याच्या नावावर होता. गिलने २५५ धावा पूर्ण करताच भारताकडून कर्णधार म्हणून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा रेकॉर्डही त्याने नावावर केला. हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता आणि त्याने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे कसोटीत २५४ धावा केल्या होत्या.

इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात भारताने एका डावात ५००+ धावा केल्या
  • ५१० - लीड्स, १९६७

  • ६०६/९ दिवस - द ओव्हल, १९९०

  • ५२१ - नॉटिंगहॅम, १९९६

  • ६२८/८ दिवस - लीड्स, २००२

  • ५०८ - द ओव्हल, २००२

  • ६६४ - द ओव्हल, २००७

  • ५०८/५ - बर्मिंगहॅम, २०२५

हे वृत्त लिहिले तेव्हा भारताने ५५८ धावांवर सात विकेट्स गमावल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदरला ४२ धावांवर जो रूटने त्रिफळाचीत केले. सुंदरने कर्णधार गिसह १४४ धावांची भागीदारी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.