गुरुकुल पद्धतीने शिक्षण हे भारताचे वैशिष्ट्य होय. पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्य व विद्याभ्यासाचा संस्कार झाला की शिष्य गुरूंच्या आश्रमामध्ये राहायला जात असे आणि शास्त्राध्ययन करत असे. गुरू व अध्ययनासाठी आलेले विद्यार्थी हे सर्व एकत्र कुटुंबाप्रमाणे राहत असत, म्हणून ‘गुरू-कुल’ हा शब्द आला असावा.
शास्त्राध्ययनाबरोबरीनेच जीवन कसे जगायचे, समाजात वावरताना कसे वागायचे वगैरे सर्वच गोष्टींचे मार्गदर्शन गुरुकुलात होत असे. राजपुत्र असो, एखाद्या सर्वसामान्यांचे मूल असो किंवा अगदी राम-कृष्णांसारखे देवाचे अवतार असो, आश्रमात जाऊन गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची परंपरा प्रत्येक जण राखत असे.
ज्या ज्ञानामुळे जीवन सुखकर होणार ते ज्ञान गुरुतत्त्वाने व्यापलेले असते. म्हणजेच ते गुरू म्हणून प्रकट झालेले असते. जीवनात लागणारा जोडीदार व बरोबरची मित्रमंडळी, जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे समाधान, शांती व स्वातंत्र्य हे सर्व मिळवून देण्यासाठी लागणारी जी शक्ती वा व्यक्ती तेच गुरुतत्त्व.
शरीरात असणारे गुरुतत्त्व भ्रूमध्याच्या मागे मेंदूत असलेल्या पिनिअल, पिच्युटरी या ग्रंथींमार्फत चालणाऱ्या व्यवहाराशी समानता दाखविते. एकूण शरीरावरची सत्ता या ठिकाणी असलेल्या ग्रंथीमुळे, त्यातून निघणाऱ्या संदेशामुळे, त्यातून निघणाऱ्या हॉर्मोन्समुळे चालते.
गुरू म्हणजे संरक्षण, गुरू म्हणजे दर्शन, गुरू म्हणजे लहान मुलाला प्रथम बोट धरून चालण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती, गुरू म्हणजे शाळेत असताना शिक्षक बनून वेगवेगळे विषय समजावून देणारी शक्ती, गुरू म्हणजे कला व एकूणच आत्मसात होणारा अभ्यास करवून घेणारी व दाखविणारी शक्ती, गुरू म्हणजे आत्मज्ञान करून देऊन समाधान व शांती देणारी शक्ती, गुरू म्हणजे कर्मबंधनातून मुक्ती देणारी शक्ती!!
तेव्हा जीवनात सद्गुरुतत्त्वाची आवश्यकता असतेच. आणि गुरुतत्त्व अंशात्मक रूपाने शिक्षक वा गुरू म्हणून प्रकट होते. ते जेव्हा पूर्णत्वरूपाने सद्गुरू म्हणून प्रकट होते तेव्हाच जीवनाला काहीतरी अर्थ प्राप्त होतो.
‘सद्गुरुवाचोनि सापडेना सोय’ असे म्हटलेले आहे, म्हणजे सद्गुरू केल्याशिवाय मार्ग सापडत नाही किंवा जीवन आनंदमय होत नाही, तसेच जिवाला स्वातंत्र्याचा अनुभव मिळून त्याला कायम स्वरूपाचा अवर्णनीय आनंदरूपी मुक्ती मिळू शकत नाही. विज्ञानाचा अभ्यास झाल्यानंतर विज्ञानाला पलीकडे कसे घेऊन जायचे की ज्या ठिकाणी वस्तू व द्रव्य संपून प्राणशक्तीमुळे जीवनाला सुरुवात होते व कलाशास्त्राची आवश्यकता भासते, ते सर्व आयुर्वेदात आहे.
म्हणून आयुर्वेद शिकत असताना शिक्षकापेक्षासुद्धा गुरूची आवश्यकता अधिक दिसते. आयुर्वेद हा केवळ विशिष्ट अभ्यासक्रमाप्रमाणे शिकविण्यासाठी शिक्षकांच्या हातात दिला तर त्यातील बराचसा भाग कळणार नाही किंवा आचरणात आणण्यासाठी अंगी बाणवता येणार नाही.
आयुर्वेदातील गुरुपद्धतीने ज्ञान मिळविण्याची परंपरा कमी झाल्यानंतर नाडीज्ञान व वनस्पतींचे स्वभाव जाणून घेण्याची इच्छा व त्यांच्याशी संपर्क हा प्रकार कमी झालेला दिसतो. सर्पासारखी जाणारी वातनाडी, डोलत डोलत जाणारी कफनाडी, नाडीचे मिनिटाला किती वेळा ठोके पडत आहेत हा नाडीचा गुणधर्म, उष्ण नाडी, गरम नाडी, थंड नाडी, तसेच नाडी भरून रक्त वाहते आहे की नाडीचा काही भाग रिकामा आहे याचे शिक्षण शिक्षकांकडून घेता येतेच पण नाडी सर्व शरीरव्यापारही सांगू शकते.
अवयवांमध्ये घडणाऱ्या घटना सांगू शकते, शरीराची गती आरोग्याकडे चाललेली आहे की अनारोग्याकडे हे सांगू शकते, मेंदू-हृदय वगैरे अवयवांमध्ये काही बिघाड आहे का हे सांगू शकते; पण यासाठी लागतात गुरू, येथे नुसते शिक्षक उपयोगी पडत नाहीत आयुर्वेदाच्या आठ अंगांपैकी मानसरोगचिकित्सा, बालग्रह, दैवव्यापाश्रय चिकित्सा समजून घेण्यासाठी जवळजवळ सद्गुरूंचीच आवश्यकता असते, या सगळ्यांचे मार्गदर्शन गुरू करू शकतीलच असे नाही.
एकूण काय, तर आयुर्वेद जीवनाला पूर्णत्व देणारी कला व विज्ञान आहे. आयुर्वेदात केवळ रोग बरा करण्याची वा औषधे कशी वापरायची, कुठल्या वनस्पती कुठल्या रोगावर कसे काम करतील एवढेच सांगण्याची ही विद्या नाही.
आयुर्वेदाने पूर्ण शरीराचे संतुलन साधले जाऊ शकते, म्हणजे शरीरातील त्रिदोष, सप्तधातू, अग्नी, मल हे तर संतुलित होतातच पण यामुळे मनाला प्रसन्न करून, मनाचा सर्व इंद्रियांवर स्वामित्वभाव स्थापन होऊन आत्म्याला प्रसन्नता मिळू शकते. असे ज्ञान असलेल्या आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी गुरुतत्त्वाची निश्र्चितच गरज लागते पण सद्गुरूंचीही आवश्यकता असते.
व्यवहारात सध्या आपण पाहतो की सद्गुरूंची मदत न घेतल्यामुळे दैवव्यपाश्रय ही चिकित्सा मागे पडली, ही चिकित्सा करणारे दुर्मीळ झाले, या चिकित्सेचे विडंबन व व्यापार करणारे तयार झाल्याने या चिकित्सेवरचा विश्र्वास उडाला. त्यामुळे एकूणच मनुष्याला मन-मनाचे आरोग्य सर्वांगीण आरोग्य मिळण्यासाठी अडचणी उत्पन्न झाल्या.
गुरुतत्त्व अंगी बाणविण्यासारखे आहे. घरात नवीन आलेल्या सुनेने सुगरण सासूच्या हाताखाली राहून तिला मदत केल्यानंतर स्वयंपाकाचे व अन्नयोगाचे ज्ञान मिळते ते रेसिपीज्ची पुस्तके वाचून मिळू शकत नाही. रेसिपीज्ची पुस्तके हे शिक्षकाचे काम करू शकतात पण घरातील सुगरण गुरूचे काम करते.
अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून त्यातून तयार होणारी शक्ती ही प्राणाकर्षण करणारी असावी. यासाठी अन्नसेवनाला यज्ञाचे स्वरूप देता आले पाहिजे. अन्नावर एकूणच वैश्र्विक संस्कार होत असल्यामुळे त्याचा प्रार्थना म्हणूनच स्वीकार करायला पाहिजे, हे सांगणारे असतात सद्गुरू. शिक्षक, गुरू व सद्गुरू या तिघांच्या मदतीनेच आयुर्वेदासारख्या विद्या शिकता येतात.
सध्याचे युग माहितीचे युग आहे. एका क्लिकमध्ये आज आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते पण माहिती व ज्ञान यात मोठा फरक आहे. पुस्तकांच्या माध्यमातून, व्याख्यानांतून माहिती मिळणे शक्य असते पण ज्ञानाला अनुभवाची जोड लागते. माहिती लक्षात ठेवलेली असते पण ज्ञान मात्र सिद्ध झालेले असते आणि तसे होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. म्हणूनच शास्त्राभ्यास करण्यासाठी, शास्त्राच्या साहाय्याने स्वतःचे व इतरांचे जीवन संपन्न होण्यासाठी गुरू हवेत.
एकूण सारांश काय तर गुरुतत्त्वाशिवाय या सृष्टीत कधीच सुख लाभू शकणार नाही. जीवन निसर्गावर आधारित आहे व निसर्ग सर्वव्यापी परमेश्र्वराचेच रूप आहे. नैसर्गिक जीवन जगण्यासाठी, निसर्गाचे ज्ञान मिळविण्यासाठी गुरुतत्त्व हाच एकमेव आधार आहे.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)