Solar Pumps Scheme : कृषिपंपाची 'थ्री फेज' योजना बंद; सोलरपंपची सक्ती, वितरण कंपनीने २४२ शेतकऱ्यांचे पैसे केले परत
esakal July 04, 2025 08:45 PM

कोदामेंढी (मौदा) : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी महत्त्वाची ठरणारी ‘थ्री फेज’ वीज कनेक्शन देण्याची महावितरणची पारंपरिक योजना २०१८ पासून बंद करण्यात आली. त्यामुळे बरेच शेतकरी अडचणीत आले असून, आता महावितरण कंपनी आणि शासनाकडून सोलर पंप योजना स्वीकारण्याची अप्रत्यक्ष सक्ती करीत असल्याचे दिसत आहे.

रामटेक, कन्हान, कामठी आणि मौदा डिविजन अंतर्गत २४२ शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी ‘थ्री फेज’ विजेची मागणी केली होती. मात्र शासनाचे धोरण सोलर पंपावर आल्याने वितरण कंपनीद्वारे सर्व शेतकऱ्याचे डिमांड भरलेले पैसे चेकद्वारे परत करण्यात आले असल्याची माहिती मौदा डिविजनकडून प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वस्त दरात वीज कनेक्शन मिळावे यासाठी ही योजना सुरू होती.

‘थ्री फेज’ विजेचे कनेक्शन हे सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते आणि त्यामुळेच राज्यभरातून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्यात आले होते. काही शेतकऱ्यांनी पाच ते सहा वर्षांपूर्वी हजारो रुपये भरले त्यांना अद्याप कनेक्शन देण्यात आले नाही. आता मात्र ही योजना बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. वेळेत पैसे भरल्यावरही त्यांना कनेक्शन देण्यात आले नाही.

प्रक्रिया ऐच्छिक तरी अप्रत्यक्षपणे सक्ती

शेतकऱ्यांची सिंचनाची सोय न झाल्याने पीक परिस्थितीवर त्याचा परिणाम जाणवला. आता शेतकऱ्यांना ‘थ्री फेज’ कनेक्शनऐवजी पैसे परत घ्या किंवा सोलर कनेक्शन लावा, अशी पर्यायी व्यवस्था देण्यात येत असून याकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. सोलर न घेतल्यास पैसे परत मिळणार आहे.

ही प्रक्रिया ऐच्छिक असली तरी अप्रत्यक्षपणे सोलरसाठी सक्तीचे करण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोलर पंपासाठी आवश्यक भांडवली गुंतवणूक देखभाल आणि कार्यक्षमता याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्य सरकारने या निर्णयाचे स्पष्ट धोरण जाहीर करावे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी कृषी विद्युत पुरवठासाठी पैसे भरले आहेत, त्यांच्याबाबत विद्युत जोडणीची पारदर्शक कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘मागेल त्याला सोलर कृषी पंप’

ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत आहे, परंतु सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलर पंप बसविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी स्वयंपूर्ण योजना आहे. यात शेतकऱ्यांना केवळ १० टक्के खर्च करणे आहे. अनु. जाती आणि जमाती प्रवर्गासाठी केवळ ५ टक्के खर्च करणे आहे. योजनेत संपूर्ण सोलर संचाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार करणार आहे.

Nagpur Power Plant Ash Collection : वीज केंद्रातील राख कुणीही न्या! जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचा निर्णय

शेती पंपासाठी ‘थ्री फेज’ विद्युत कनेक्शन देणे बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे सोलर पंपाकरिता अर्ज करून सोलर पंप लावण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. ज्यांनी ‘थ्री फेज’ची मागणी केली होती अशा सर्व शेतकऱ्यांचे (ग्राहकांचे) पैसे चेकद्वारे परत करण्यात आले.

- विजय कांबे, उप कार्यकारी अभियंता, सबडिविजन मौदा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.