Wimbledon 2025 : विम्बल्डन टेनिस, चार अव्वल खेळाडूंचे आव्हान संपुष्टात; अरीना आणि अल्काराझने सहज जिंकली फेरी
esakal July 04, 2025 03:45 PM

लंडन : अव्वल मानांकित अरीना सबलेंका हिने विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅममधील आपली विजयी घोडदौड कायम राखली, मात्र अव्वल पाचमध्ये असलेल्या इतर चार खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला.

महिला विभागात दुसरी मानांकित कोको गॉफ, तिसरी मानांकित जेसिका पेगुला, चौथी मानांकित जास्मिन पाओलिनी व पाचवी मानांकित जेंग किनवेन या मानांकित खेळाडूंना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये हार पत्करावी लागल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष विभागात कार्लोस अल्काराझ याने दुसऱ्या फेरीची लढत सहज जिंकत पुढल्या फेरीत प्रवेश केला.

अरीना सबलेंका हिने दुसऱ्या फेरीच्या लढतीत मेरी बौझकोवा हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला. सबलेंका हिने बौझकोवा हिला ७-६, ६-४ असे पराभूत करताना अव्वल दर्जाचा खेळ केला.

स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याने ओलिव्हर टारवेट याच्यावर तीन सेटमध्ये सहज विजय साकारला. अल्काराझ याने ६-१, ६-४, ६-४ असे तीन सेटमध्ये हरवले. अल्काराझ याने दोन तास व १७ मिनिटांमध्ये बाजी मारली.

Shubman Gill Records: कॅप्टन गिलची २६९ धावांची खेळी अन् १३ मोठे विक्रम; गावस्कर, तेंडुलकर, कोहली यांच्यावर ठरला वरचढ

भारताचा टेनिसपटू एन. श्रीराम बालाजी याने मेक्सिकोचा त्याचा साथीदार मिग्वेल वरेला याच्या साथीने विम्बल्डन ग्रँडस्लॅममधील पुरुषांच्या दुहेरीत विजयी वाटचाल केली. बालाजी-वरेला या जोडीने लर्नर टिएन-ॲलेक्झँडर कोवासेविच या जोडीवर ६-४, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविच याने डॅनियल इवांस याला तीन सेटमध्ये नमवले. जोकोविच याने इवांस याचे आव्हान ६-३, ६-२, ६-० असे संपुष्टात आणले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.