Akot Crime : सावत्र पित्याने केली नऊ वर्षीय मुलाची हत्या; तक्रार करताच समोर आला आरोपी!नेमकं काय घडलं?
esakal July 04, 2025 03:45 PM

अकोट : शहर पोलिस स्टेशनला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आलेला इसमच चिमूकल्याचा मारेकरी ठरला. साथीदाराच्या मदतीने त्याने नऊ वर्षीय चिमूकल्याचा मुतदेह एका गोणीत घालून जंगलात फेकून दिला होता.

दहा तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी अकोला पाठविण्यात आला आहे. हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. चिमुकल्याची हत्या करणाऱ्या निर्दयी इसमाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपी सावत्र पित्यास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

२ जुलै रोजी मुक्ता कान्हेरकर या त्याच्या पतीसह अकोट शहर पोलिस ठाण्यात तिचा मुलगा दर्शन वय ९ वर्ष, रा.राजस्थान चौक हा हरवला असल्याची तक्रार द्यायला आल्या होत्या. दिवसभर चिमुकला बेपत्ता असल्याने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल माळवे यांनी आपली शोध मोहीम सुरू केली.

एका सीसीटीव्ही कॅमेरात मुलगा दोन इसमांसह दुचाकीवर जाताना दिसला. सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता यातील दुचाकीवरील इसम पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला आला असल्याचे अमलदारांच्या लक्षात आले. त्यानंतर या इसमाची माहिती काढली असता तो इसम आकाश साहेबराव कान्हेरकर, रा.चिंचोणी, ता.अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती हा महिलेचा दुसरा पती असल्याचे समजले.0 पोलिसांनी आकाश साहेबराव कान्हेरकर याला तपास कामी ताब्यात घेतले असता, त्याने त्याचा सहकारी गौरव वसंत गायगोले वय २५ वर्ष याच्या मदतीने मुलाला दुचाकीवरुन जंगलात घेऊन गेल्याचे सांगत गुन्ह्याची कबुली दिली.

रात्री १२ वाजता १०० हून अधिक पोलिस चिमुकल्या दर्शनच्या शोधासाठी तापसकामी लागले. अख्खी रात्र पोपटखेड ते खिरकुंड पर्यंतचा परिसर पिंजून काढावा लागला. अखेर सकाळी ९.३० दरम्यान चिमुकल्या दर्शनचा मृतदेह चिंचोणा हिरापूर येथील गायमुख परिसरात एका गोणीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला.

चिमुकल्या दर्शनाला गोणीत घालून जंगलात फेकून दिले होते. आरोपींनी त्यावर निंबाच्या झाडाच्या फांद्या टाकून मृतदेह झाकण्याचा प्रयत्न केला होता. आदिवासी भागातील मार्डी, खिरकुंड गावातील ग्रामस्थांनी चिमुकल्याच्या शोधासाठी दुचाकीने परिसरात शोध मोहिमेत सहभाग घेतला होता. या प्रकरणात दोन दिवसात तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल असे अनमोल मित्तल यांनी सांगितले.

Marathwada Biodiversity: मराठवाड्यात आढळल्या सहा नव्या वनस्पतींच्या प्रजाती; जैवविविधतेचे नवे पैलू समोर, दोन अभ्यासकांचे संशोधन शोध मोहिमेत दिशाभूलचा प्रयत्न

दर्शनची हत्या केल्याचे कबूल केल्यावर त्याचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेले त्या ठिकाणी मृतदेह कुठे लपवला हे सांगताना पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना रात्रभर शोधमोहीम राबवावी लागली. परिसर पिंजून काढून अखेर चिंचोना गोमुख भागात एका कपारित मृतदेह सापडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.