भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने सर्वबाद 587 धावा केल्या होत्या. तर शेवटच्या सत्रात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने 3 बाद 77 धावा केल्या. भारताकडे अजूनही 510 धावांची मजबूत आघाडी आहे. असं असताना दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्या खेळीमुळे इंग्लंडा दुसऱ्या दिवशी 77 धावांपर्यंत मजल मारता आली. पण असं करत असताना इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास अडचण येत होती. ब्रूक भारतीय गोलंदाजांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही रणनिती पाहून यष्टिरक्षक ऋषभ पंत संतापला.
कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस रवींद्र जडेजा इंग्लंडच्या डावातील 19वं षटक टाकण्यासाठी मैदानात आला होता. जडेजाच्या गोलंदाजीचा सामना करताना ब्रुकला अडचण येत होती. अशा परिस्थितीत हॅरी ब्रुक प्रत्येक चेंडूनंतर वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होता. जाणीवपूर्वक हातमोजे काढायचा आणि क्रीजपासून दूर उभे राहायचा. त्याची ही खेळी पाहून ऋषभ पंत समजून गेला. हॅरी ब्रुकच्या कृतीवर ऋषभ पंत आणि जडेजा यांनी प्रतिक्रिया दिली. पंत म्हणाला की, “तू वेळ वाया घालवत आहेस.” जडेजानेही पंचांकडे पाहिले आणि ब्रुक असे का करत आहे? असे विचारले.
ऋषभ पंतने पंचांना बोलावून सांगितले की, “तो वेळ वाया घालवत आहे, गोलंदाज तयार आहे. काय चाललंय? तो प्रत्येक चेंडूची तयारी करण्यासाठी वेळ काढत आहे.” हॅरी ब्रुकचा हेतू जडेजाला आणखी एक षटक टाकण्यापासून रोखण्याचा होता. रूट आणि ब्रुक कसे तरी नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा प्रयत्न करत होते. आता तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताने इंग्लंडचे उर्वरित विकेट झटपट बाद केले तर नक्कीच हा सामना भारताच्या पारड्यात झुकलेला असेल. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.