रवींद्र जडेजाकडून नियमांचं उल्लंघन, बीसीसीआय कारवाई करणार का? अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण
GH News July 04, 2025 06:08 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलं. पहिल्या डावात भारताने 587 धावांचा डोंगर रचला आहे. तसेच इंग्लंडच्या 77 धावांवर 3 विकेट देखील काढल्या आहे. आता तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडच्या खेळाडूंना झटपट बाद केलं तर सामना विजयाची संधी आहे. असं असताना दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने बीसीसीआयचा नियम मोडल्याचं समोर आहे. त्यामुळे दबक्या आवाजात कुजबूज सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, बीसीसीआयने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या नियमांचं पालन करणं सर्वांसाठी अनिवार्य आहे. पण दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी रवींद्र जडेजाने एक मोठा नियम मोडल्याचं समोर आलं आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ हॉटेलमधून स्टेडियममध्ये परतत असताना रवींद्र जडेजाने बीसीसीआयच्या नियमाकडे दुर्लक्ष केले. जडेजा टीम बसमधून स्टेडियमवर गेला नाही. मैदानात एकटाच इतर खेळाडू येण्यापूर्वी पोहोचला. जडेजाने अशी कृती करून बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन केलं. पण संघाचे हित लक्षात घेऊन हा नियम मोडल्याचं स्पष्टीकरण जडेजाने दिलं. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर, टीम इंडियाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्याने याबाबत स्पष्ट केले. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने 89 धावांची शानदार खेळी केली आणि कर्णधार शुभमन गिलसोबत सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली.

रवींद्र जडेजाने सांगितलं की, “बॉल नवीन असल्याने, मला वाटले की मी जास्त वेळ फलंदाजीचा सराव करावा. कारण जर मी नवीन चेंडू चांगला खेळलो तर फलंदाजी करणे थोडे सोपे होईल,” त्यामुळे दुसऱ्या दिवशी फलंदाजीला मदत करण्यासाठी एकटाच मैदानात आल्याचं स्पष्टीकरण दिलं. “मला वाटले की मी लंच ब्रेकपर्यंत फलंदाजी करू शकतो. जेव्हा तुम्ही बॅटने संघाला योगदान देता तेव्हा खूप चांगले वाटते. जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा संघाने 5 विकेट गमावल्या होत्या आणि अशा परिस्थितीत मी चांगली फलंदाजी करू शकलो, ज्यामुळे मला आनंद झाला.”, असंही जडेजा पुढे म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.