राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी विरूद्ध मराठी असा वाद पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनाही मराठी बोलायला यायला हवं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील जनतेची मागणी आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता वातावरण आणखी तापले आहे. अशातच आता एका प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचलं आहे. त्याने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांनीही मराठी बोलली पाहिजे असा आग्रह राज ठाकरेंचा आहे. मात्र आता प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना मराठी भाषेच्या आग्रहावरून डिवचलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत केडिया यांनी म्हटलं की, ‘राज ठाकरे, लक्षात घ्या की, मी मुंबईत 30 वर्षांपासून राहत असून मला मराठी नीट येत नाही. आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोल?.’
समोर आलेल्या माहितीनुसार, सुशील केडिया यांच्या ट्विटनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना केडिया यांना धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. याबाबत केडिया यांनी ट्विट करत म्हटले की, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमक्या दिल्या जात आहेत. कृपया मला सुरक्षा देण्यात यावी’ अशी मागणी मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ‘महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावेच लागेल. जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुमचा दृष्टिकोन असा नसावा की तुम्ही मराठी बोलणार नाही. जर महाराष्ट्रात कोणी मराठीचा अपमान केला तर आम्ही आमचे कायदे लागू करू.’
शनिवारी (5जुलै) सकाळी 10 वाजता मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. या मेळाव्यात राज ठाकरे यांच्याकडून केडियांना उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.