टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे सिराजवर सडकून टीका करण्यात आली. सिराजला दुसऱ्या सामन्यातून डच्चू द्यावा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात आली. त्यात भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने भारताचं टेन्शन दुप्पटीने वाढलं. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाजांचा कस लागणार, असं निश्चित समजलं जात होतं. मात्र आकाश दीप याच्यानंतर मोहम्मद सिराज याने धमाका केला.
भारताने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात सर्वबाद 587 धावा केल्या. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी खेळ संपेपर्यंत 3 झटके दिले आणि दिवस आपल्या नावावर केला.त्यानंतर सिराजने तिसऱ्या दिवशी आकाश दीपप्रमाणे सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली.
आकाश दीप याने इंग्लंडला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर बेन डकेट आणि ओली पोप या दोघांना झिरोवर आऊट केलं. तर त्यानंतर मोहम्मद सिराजने झॅक क्रॉली याला करुण नायर याच्या हाती 19 धावांवर कॅच आऊट केलं. त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रूक या जोडीने डाव सावरत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट गमावली नाही.
इंग्लंडने दुसऱ्या दिवसापर्यंत 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 77 धावा केल्या. त्यानंतर हॅरी-जो जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र सिराजने तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या तर इंग्लंडच्या डावातील 22 व्या ओव्हरमध्ये कमाल केली.
सिराजकडून सलग 2 झटके, इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
सिराजने तिसऱ्या बॉलवर अनुभवी जो रुट याला लेग साईडच्या दिशेला जाणाऱ्या बॉलवर विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. रुटने 22 धावा केल्या. रुट आऊट झाल्यानंतर कॅप्टन बेन स्टोक्स मैदानात आला. सिराजने स्टोक्सला पहिल्याच बॉलवर पंतच्या हाती कॅच आऊट केलं. इंग्लंडने अशाप्रकारे पाचवी विकेट गमावली. त्यानंतर सिराज हॅटट्रिक बॉलवर होता. जेमी स्मिथ सिराजसमोर होता. सिराज हॅटट्रिक घेणार का? याची उत्सुकता चाहत्यांना होती. मात्र जेमी स्मिथने चौकार ठोकला आणि सिराजला हॅटट्रिक करण्यापासून रोखलं.