शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार? पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार?
Marathi July 04, 2025 10:25 PM

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. येत्या 18 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  बिहारमधील मोतीहारीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाऊ शकते. पीएम किसानचा हप्ता चार महिन्यांच्या अंतरानं वर्ग केला जातो. यापूर्वी पीएम किसानचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 ला जारी करण्यात आला होता. त्याला चार महिने पूर्ण झाले आहेत. सध्या केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

यापूर्वीची आकडेवारी आणि पाहिली असता एप्रिल ते जुलै या दरम्यान दिल्या जाणाऱ्या पीएम किसानच्या हप्त्याला उशीर झालेला आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 31 जुलैपर्यंत जारी केला जाणं अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता बिहारमधून जारी केला होता.

पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकारकडून 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना वितरीत केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधी दरम्यान तिसरा हप्ता दिला जातो.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रतेच्या अटी

या योजनेनुसार शेतकऱ्याच्या खात्यावर एका वर्षात 6000 रुपये पाठवले जातात. ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती आहे. ज्यानं ई केवायसी प्रक्रिया, जमीन पडताळणी आणि आधार बँक खातं लिंक केलेलं असेल त्याला या योजनेचा लाभ मिळेल. ज्या व्यक्तीला 10 हजारांपेक्षा अधिक मासिक पेन्शन मिळते त्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर, इंजिनिअर यांना योजनेबाहेर ठेवण्यात आलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 11 कोटी शेतकऱ्यांना 3.64 लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा

पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे.  या योजनेतून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये दिले जातात. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून 12000 हजार रुपये मिळतात. महाराष्ट्रातील शेतकरी देखील नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.