Sindhudurg News – SBI च्या अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागिरकाची केली आर्थिक फसवणूक, गुन्हा दाखल
Marathi July 05, 2025 03:25 AM

बँकेच्या लिलावातील कार देतो अशी बतावणी करून एसबीआयचा अधिकाऱ्याने सेवानिवृत्त अभियंता असलेल्या एका ज्येष्ठाची आर्थिक फसवणूक केली. रतनकुमार मनोज सावंत (वय 74) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एसबीआयचा प्रोपेशनल अधिकारी प्रियंक ए. आंगणे (वय 55) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रतनकुमार सावंत यांची वैभववाडी तालुक्यात शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे नेहमीच याठिकाणी ये-जाणे सुरू असते. 11 ते 18 मार्च दरम्यान रतनकुमार हे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी प्रियंक आंगणे याची त्यांच्यासोबत ओळख झाली. रतनकुमार यांनी आपणास एक गाडी हवी आहे, असे त्यांनी प्रियंक याला सांगितले. प्रियंक याने आपण एसबीआय बँकेत प्रोपेशनवर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. बँकेच्या लिलावातील अनेक गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक गाडी तुम्हाला देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कणकवलीतील एका बँकेत खाते असलेल्या रतनकुमार यांनी तीन चेकद्वारे 4 लाख 80 हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी प्रियंक याला दिली. त्यानंतर दोघांमध्ये कारबाबत मोबाईलवरून चर्चा होत होती. काही काळानंतर रतनकुमार यांनी कार देण्याबाबत प्रियंक याच्याकडे तागदा लावला होता. मात्र, प्रियंक याने टोलवाटोलवी उत्तरे देत कार देण्याबाबत टाळाटाळ केली. रतनकुमार यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात प्रियंक याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार प्रियंक याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.