Tempo Bike Accident : टेम्पोची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू
esakal July 05, 2025 05:45 AM

- कैलास म्हामले

कर्जत - रायगड जिल्ह्यातील कर्जत-नेरळ-कल्याण या राज्य महामार्गावर गुरुवारी (४ जुलै) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी थेट टेम्पोखाली अडकली आणि दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातात मृत्यू पावलेले दाम्पत्य हे नेरळजवळील आसलपाडा गावातील रहिवासी होते. एकनाथ बबन शेंडे (वय ५२) आणि जयश्री एकनाथ शेंडे (पत्नी) हे गुरुवारी दुपारी माणगाव गावातून आसलपाडा येथील घरी जात असताना कर्जत कडून कल्याण दिशेने जाणाऱ्या समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक MH 05 EL 4432) ने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

अपघातानंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि दुचाकी टेम्पोखाली अडकली. आजूबाजूचे स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. जखमींना तत्काळ भिवपुरी येथील रायगड रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शेंडे यांचा मृत्यू झाला. जयश्री शेंडे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांच्यावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असतानाच रात्री ९.३० वाजता त्यांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर टेम्पोचालक वाहन घटनास्थळीच सोडून नेरळ पोलिस ठाणे येथे हजर झाला होता. मात्र अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले असून नेरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. टेम्पोचालकाची चौकशी सुरू असून अधिक तपास नेरळ पोलिस ठाणे वतीने सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या मते, कर्जत-नेरळ-कल्याण मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वाहनचालक भरधाव वेगात वाहन चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अपघातग्रस्त ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची आणि वेगमर्यादेच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.