Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड
esakal July 05, 2025 05:45 AM

पुणे - राज्यात पहिली पासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राजकारण तापलेले असताना त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील कार्यक्रमात भाषणाचा समारोप करताना ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ असे म्हणतानाच शेवटी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून महायुती सरकार मराठीचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्याविरोधात रोष निर्माण झाल्याने सरकारने या निर्णयाचा जीआर रद्द केला.

त्यामुळे मुंबईमध्ये उद्या (ता.५) याचा विजयोत्सव करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे यासह अन्य पक्षांद्वारे विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती असा वादही गेल्या काही काळापासून सुरु आहे.

मुंबईत विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे, त्यात मराठीचा विषय आक्रमकपणे मांडला जात आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी कोंढवा येथील श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनात भाषण संपविताना ‘जय गुजरात’ ही घोषणा दिली त्यामुळे वाद सुरु झाला आहे.

दरम्यान या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकल्पाचे उद्घाटन करतात, त्या प्रकल्पाची भरभराट होते, हा आजवरचा इतिहास आहे. कोणत्याही शहराला बाजारपेठेशिवाय शोभा नसते. गुजराती समाजाने शहरांमध्ये बाजारपेठा प्रस्थापित करून शहरांना शोभा आणली.

मोदी आणि अमित शहा यांनी राष्ट्रहीतास अग्रक्रम देऊन राष्ट्रहिताच्या आड येणाऱ्या आव्हानांचे संधीत रूपांतर केले त्यामुळे देशाची प्रगती झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताची दखल गांभीर्याने घेतली जात आहे. महाराष्ट्राच्या विकासात गुजराती समाजाचे मोठे योगदान असून महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुजराती समाज समरस आणि एकरूप होऊन गेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.