IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी
esakal July 05, 2025 10:45 AM

India vs England 2nd Test Day 3 Live Updates in Marathi Cricket News : हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांच्या विक्रमी ३०३ धावांच्या भागीदारीनंतर टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केले. भारतीय संघाच्या ५८७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ८४ धावांवर ५ फलंदाज गमावले होते. त्यानंतर ब्रूक व स्मिथ यांनी दमदार खेळ करताना संघाला ३८७ धावांपर्यंत पोहोचवले. आकाश दीपने पुन्हा एकदा नव्या चेंडूसह कमाल करताना ही जोडी तोडली. त्यानंतर इंग्लंडची गाडी घसरली.

बर्मिंगहॅम कसोटी फलंदाजांनी गाजवली... शुभमन गिलच्या २६९ धावांनी भारताला पहिल्या डावात ५८७ धावांवर पोहोचवले. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ भारताने ८४ धावांवर तंबूत पाठवला होता. आता ही मॅच आपलीच असा भारताचा समज झाला होता आणि हॅरी ब्रूक व जेमी स्मिथ या जोडीने तो भ्रमाचा भोपळा फोडला. या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा मारा निष्प्रभ केला आणि नंतर तुफान फटकेबाजी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३६८ चेंडूंत ३०३ धावांची विक्रमी भागीदारी केली.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीच्या षटकात मोहम्मद सिराजने जो रूट व बेन स्टोक्स यांना सलग चेंडूंवर माघारी पाठवून भारताला मोठं यश मिळवून दिलं होतं. पहिले सत्र गाजवल्यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा खेळ मंदावला आणि त्यामुळे भारतीय गोलंदाजांना वरचढ ठरण्याची संधी मिळाली. पण, ब्रूक-स्मिथ जोडीने त्यांना भीक घातली नाही. या दोघांनी वैयक्तिक १५० पार धावा कुटल्या. हॅरी ब्रूक २३४ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारांसह १५८ धावांवर बाद झाला.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सर्वोच्च भागीदारी
  • ३५० - इयान बेल आणि केविन पीटरसन, द ओव्हल, २०११

  • ३१६ - गुंडप्पा विश्वनाथ आणि यशपाल शर्मा, चेन्नई, १९८२

  • ३१४ - राहुल द्रविड आणि गौतम गंभीर, मोहाली, २००८

  • ३०८ - ग्राहम गूच आणि अॅलन लँब, लॉर्ड्स, १९९०

  • ३०३ - हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ, बर्मिंगहॅम, २०२५

इंग्लंडसाठी कसोटीत सहा किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील सर्वाधिक भागीदारी
  • ३९९ - जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, २०१६

  • ३३२ - स्टुअर्ट ब्रॉड आणि जोनाथन ट्रॉट विरुद्ध पाकिस्तान, लॉर्ड्स, २०१०

  • ३०३ - हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ, बर्मिंगहॅम, २०२५

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

आकाश दीपने इंग्लंडची सेट जोडी तोडली. त्याने टाकलेला चेंडू ब्रूकच्या बॅटला लागून यष्टींवर आदळला. त्यानंतर आकाशने आणखी एक विकेट घेताना ख्रिस वोक्सला ( ५) बाद केले आणि भारताला सामन्यात पुनरागमन दिसू लागले. ब्रेडन कार्सला शून्यावर मोहम्मद सिराजने पायचीत केले. मोहम्मद सिराजने सहा विकेट्स घेताना इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर गुंडाळला आणि भारताला १८० धावांची आघाडी मिळाली. आकाश दीपने चार विकेट्स घेतल्या. स्मिथ २०७ चेंडूंत २१ चौकार व ४ षटकारांसह १८४ धावांवर नाबाद राहिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.