पहलगाम हल्ल्याचा आरोप असलेल्या दहशतवाद्यांबद्दल पाकिस्तानमधील राजकीय नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी धक्कादायक विधान केले आहे. पहलगाम हल्लाचा कट रचणारा दहशतवादी मसूद अझहरसंदर्भात भुट्टो यांनी हास्यस्पद विधान केले आहे. ते म्हणाले, मसूद अझहर याच्याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. भारताकडे काही पुरावे असतील तर पाकिस्तानला द्यावे. मसूद याला अटक झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे भुट्टो यांनी म्हटले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अफगाणिस्तानात असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
आम्हाला मसूद अझहरची माहिती द्या
बिलावल भुट्टो यांनी अल जझीराला मुलाखत दिली. त्यात म्हटले की, पाकिस्तानात हाफिज सईद मुक्त नाही. पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई केली आहे. मसूद अझहरला आम्ही अटक करू शकलो नाही. आम्हाला अजून त्याचा शोध घेता आला नाही. अफगाण जिहादीसोबतचा त्याचा भूतकाळ पाहिल्यावर आम्हाला तो अफगाणिस्तानात आहे, असे वाटते. जर भारत सरकारने मसूद पाकिस्तानी भूमीवर असल्याची माहिती आम्हाला दिली तर आम्ही त्याला अटक करण्याचे आश्वासन देतो आणि आम्हाला ते करायला आनंद होईल, असे भुट्टो यांनी म्हटले. खरं तर मसूद अझहर हा पाकिस्तानत आहे. त्याची माहिती भुट्टो यांना देखील आहे. जेव्हा भारत या दहशतवाद्यांची मागणी करतो तेव्हा पाकिस्तान याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, असे दर्शवतो.
मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यावेळी पाकिस्तानमधील बहलावलपूर येथील जैशच्या मुख्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात मसूदचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. मसूद अझहरने स्वतः कबूल केले की भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याचा भाऊ, बहीण, नात आणि चार मुले मारली गेली.
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेने २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून २६ पर्यंटकांची हत्या केली होती. यापूर्वी त्याचा २००१ मध्ये संसदेवरील हल्ला, २०११ मध्ये २६/११ मुंबई हल्ला, २०१६ मध्ये पठाणकोट हल्ला आणि २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यात सहभागी आहे.