शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमावेळी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हटले होते. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुशायरा शायरी सोडा, जर सत्तेत राहायचं असेल अमित शाहांच्या आशीर्वादाने तर मुजरा करावा लागेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी केला.
नेमकं प्रकरण काय?पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात म्हणाले, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. अमित शाह हे देशसेवेसाठी समर्पित आहेत राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे. यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली होती.
यानंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले. ‘पुण्यातील गुजराती बांधवांनी एक कॉम्प्लेक्स उभारलं आहे. याचं आज लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणतो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हटलो.’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?त्यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांसाठी आता मुशायराही करु शकतात. ते मुजराही करु शकतात. सध्या त्यांचा मुजरा सुरु आहे. शायरी काय ते सहज दिसली म्हणून वाचतात. मी त्यांना ओळखतो. त्यांना साधी मराठी कविताही बोलता येत नाही. मुशायरा शायरी जर सत्तेत राहायचं असेल अमित शाहांच्या आशीर्वादाने तर मुजरा करावा लागेल. करु द्या, असे संजय राऊत म्हणाले.