Supriya Sule : मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे या दोघांचा विराट असा विजयी मेळावा झाला. हिंदी सक्तीचा शासन निर्णय सरकारला मागे घ्यावा लागल्यामुळे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीची चांगलीच चर्चा होत आहे. या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रिकरण हे जरी मुख्य आकर्षण असलं तरी सुप्रिया सुळे यांनी मंचावर जाऊन केलेल्या एका कृतीची सध्या विशेष चर्चा होत आहे.
विजयी मेळाव्यात अगोदर राज ठाकरे यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. दोन्ही भावांना एकत्र आणलं, असा टोला लगावला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. या दोन्ही नेत्यांची भाषणं झाल्यानंतर मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी मंचावर गेले. त्यानंतर या सर्व पक्षांनी एकत्र येत फोटोही काढले तसेच जनतेला अभिवादन केले.
याच वेळी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका कृतीची सगळीकडे चर्चा होत आहे. मंचावर काढले जात होते. नेतेमंडळी एकमेकांच्या भेटी घेत होते. हस्तांदोलन करत होते. याच वेळी सुप्रिया सुळे यांनी एक गोष्ट हेरली. मंचावर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना एकत्र आणलं. तसेच या दोन्ही नेत्यांच्या हातांना धरून मंचावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूला उभे केले. त्यांच्या या कृतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढची पिढीदेखील सोबत पाहायला मिळाली. नंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र उभे राहात जनतेला अभिवादन केले. सुप्रिया सुळे यांच्या याच कृतीची सगळीकडे चर्चा होत आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बांधूंचा हा एकत्र विजयी मेळावा झाल्याने मुंबई तसेच राज्यातील राजकारणाची गणितं बदलण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता भाजपा, शिंदे गटाला आपली रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.