Nashik Crime : नाशिकमध्ये ट्रकचालकाचा खून उघडकीस; चामरलेणी खून प्रकरणी ४ संशयितांना अटक
esakal July 05, 2025 09:45 PM

पंचवटी- म्हसरूळ शिवारातील चामरलेण्याच्या पायथ्याशी एका ट्रकचालकाचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकला मोठे यश मिळाले असून, खून प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. लूटमारीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला होता.

२२ जूनला पहाटेच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील चामरलेणी मार्गालगत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या डोक्यात व चेहऱ्यावर धारदार चाकू व दगडाने वार केल्याचे आढळून आले. उमेश आंबिगार (वय ३४, रा. मरकुंडा, ता. बिदर, कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खूनाचा तपास गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकाऱ्यांकडून केला जात होता. त्यासाठी पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून मिळालेल्या माहितीवरून व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पथकाने संशयित विजय मधुकर खराटे (वय २०), संतोष सुरेश गुंबाडे (२६), अविनाश नामनाथ कापसे (२०) आणि रवी सोमनाथ शेवरे (२८) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी हा खून केल्याचे समोर आले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक हिरामण भोये, जया तारडे, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, वाघमारे, म्हसदे, भांड, मरकड, काठे, गायकवाड, देवरे, परदेशी, साळुंके, लिलके, पवार, कोळी, आढाव यांनी ही कामगिरी केली.

असा केला खून

संशयित रवी शेवरे याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ उभ्या असलेल्या ट्रक चालक उमेश आंबिगार याची रेकी केली. त्यानंतर चारही संशयितांनी सिगारेट पेटविण्याच्या बहाण्याने उमेश यास ट्रकमधून खाली बोलावले. त्यानंतर कॅबिनमध्ये घुसून पैशांची मागणी केली. विरोध केल्यावर संतोष गुंबाडे याने टोकदार दगडाने डोक्यावर वार केला व इतरांनी मारहाण केली. तसेच उमेश कडील एटीएम कार्ड्स काढून घेत त्याचा पिन घेतला.

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

चुकीचा पिन दिल्याने पैसे न मिळाल्याने संतापून पुन्हा मारहाण करण्यात आली. दुचाकीवरून अवतार पॉईंटजवळील एटीएमवर नेले, पण पैसे निघाले नाहीत. त्यामुळे चौघांनी मिळून उमेश यास चामर लेणीच्या पायथ्याशी नेले. तेथे दांडके, दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डबक्यात बुडवून गळा दाबून त्याचा खून केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.