‘ईशा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आदिवासी महिला लक्षाधीश बनल्या आहेत आणि आता त्या उत्पन्न कर भरत आहेत, याचा मला आनंद आहे. अशा उपक्रमांमुळे विकसित भारत घडेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व सद्गुरु यांचे स्वप्न साकार होईल,’ असे विधान केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांनी केले. ते काल(शुक्रवारी) ईशा योग केंद्र, कोयंबतूर तामिळनाडू येथे आदिवासी गावकऱ्यांशी बोलत होती.
जुएल ओराम यांनी थनिकंडी गावातील आदिवासी महिलांच्या कार्याची प्रशंसा केली. 2018 साली ईशा फाउंडेशनच्या मदतीने ‘चेल्लमारीयम्मन स्वयंसहायता गट’ स्थापन झाला होता. या गटातील महिलांनी फक्त 200 रुपयांच्या भांडवलावर आदियोगीजवळ छोट्या दुकानांद्वारे व्यवसाय सुरू केला. कमी पैशांनी सुरु झालेले हे व्यवसाय आता गगनाला भिडले आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. सध्या या महिला अभिमानाने कर भरतात आणि देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत.
जुएल ओराम यांनी ईशा फाउंडेशनच्या ग्रामीण विकास आणि आदिवासी कल्याण उपक्रमांचे कौतुक केले. तसेच त्यांनी जवळच्या आदिवासी गावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ‘ईशा संस्थेचे ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म आणि संस्कृती जपण्याचे कार्य खूपच प्रशंसनीय आहे. आज मी ज्या गावाला भेट दिली, त्या ठिकाणचे लोक ईशा फाउंडेशनच्या कार्यामुळे अत्यंत समाधानी आहेत’ असं ओरम यांनी म्हटले.
समोर आलेल्या माहितीनुसार ईशा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी व ग्रामीण भागात आरोग्यसेवा, शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. आर्थिक सक्षमीकरण करण्याबरोबरच शैक्षणिक शिष्यवृत्ती, 24×7 आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन, पोषणपूरक आहार, कौशल्यविकास कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे कामही ईशा फाउंडेशन करत आहे.
ओरम यांनी ईशा योग केंद्रातील पवित्र स्थळांना भेट दिली. यात 112 फूट उंचीचा आदियोगी, ऊर्जा-संचयित जलकुंड सूर्यकुंड, ध्यानासाठी समर्पित ध्यानलिंग, आणि करुणामय या ठिकाणांचा समावेश होता. तसेच त्यांनी सद्गुरु गुरुकुलम संस्कृती या भारतीय गुरुकुल पद्धतीवर आधारित निवासी शाळेला आणि बालकेंद्रित शिक्षणासाठी प्रसिद्ध ईशा होम स्कूलला देखील भेट दिली व इशाच्या उपक्रमांचे कौतुक केले.