सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर मागे घेतल्यानंतर आज मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी जोरदार हल्लाबोल केला.
यांची मुलं इग्रंजी माध्यमात शिकत आहेत, मग यांना मराठी भाषेचा एवढा पुळका का? अशीही टीका अनेकदा होत होती, शिक्षणाच्या माध्यमावरून भाषिक अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचा राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान ही सभा पार पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आला आहे. मुंबईतील मराठी माणसांचा विजय मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू यांचे भाषण झाले. त्यानंतर आता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आजी, माजी खासदार येण्यास सुरवात झाली आहे. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
दरम्यान विजय मेळावा पार पडण्यानंतर आता संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “मला वाटतं की आम्ही आज सण साजरा करत आहोत. नक्कीच आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक मराठी घराघरात या निमित्ताने गोडधोड होत असेल. सण होत असेल. मला घरामध्ये सांगितलं आज इतका मोठा कार्यक्रम होत आहे. आपल्यासाठी आनंदाचा सण आणि क्षण आहे. तुम्ही त्यासाठी सुंदर एक कोट घालून जा. हे मला घरच्यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या घरातील याच भावना आहेत” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, विजयी मेळावा पार पडला, यामुळे राज्यभरातील मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये विजयी जल्लोष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.