संकट आले की आपण सर्व मराठी एकवटतो आणि संकट गेले की एकमेकांशी भांडतो. पण आता असा नतद्रष्टपणा अजिबात करायचा नाही. आत्ताच डोळे उघडा, जागे व्हा. आत्ता आलेली जाग जाणार असेल तर मग मराठी आईची मुले म्हणवून घेऊ नका, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुटू नका, फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका, अशी साद तमाम मराठी माणसांना घातली. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, अशी गर्जनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
मराठी एकजुटीचा विजयी मेळावा वरळी एनएससीआय डोम येथे आज झाला. यावेळी उपस्थित मराठी महासागराला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्दय़ावर एकजूट दाखविणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे संबोधले, त्यांचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मीही त्यांना सन्माननीय राज ठाकरे म्हणतोय, असे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच सांगितले. माझ्या मराठी हिंदू बांधवांनो आणि माझ्या भगिनींनो असे संबोधत उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात केली. अप्रतिम मांडणी केली, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले.
मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली. आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी, असे ठणकावून सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्रात आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला.
मोदींची शाळा कोणती?
तुम्ही आजपर्यंत आमचा वापर करून घेतलात… अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुखांचा हात नसता तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? सर्वात उच्चशिक्षित आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
भाजप अफवांची फॅक्टरी
भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केले होते की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व ही काही कोणत्याही भाषेची मत्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मराठी माणसाने लढून हक्काची मुंबई मिळवली
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मराठी माणसांनी लढून हक्काची मुंबई मिळवली. तेव्हाही तत्कालीन सत्ताधारी मुंबई मराठी माणसांना देण्यास तयार नव्हते. आज ते मराठी असल्याचा दावा करतात. पण ते केवळ नावाने मराठी आहेत. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे आता तपासावे लागेल. स. का. पाटील बोलले होते, ‘मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.’ कशी नाही मिळत? झुकवलं, वाकवलं, गुडघ्यावर आणलं आणि मराठी माणसाने आपल्या हक्काची मुंबई मिळवली, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
तुम्ही 2014 नंतर महाराष्ट्र व मुंबईचे लचके तोडले
मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला असे तर तुम्हाला वाटत असेल, तर 2014 नंतर तुम्ही जे काही महाराष्ट्र व मुंबईचे लचके तोडलेत, मुंबई, महाराष्ट्रातून सर्वच उद्योगधंदे बाहेर पळवले, आर्थिक केंद्र गेले. हिरे व्यापार गेले. मोठमोठी ऑफिसे गेली. आपल्या काळात महाराष्ट्रात उद्योगधंदे येत होते, ते कुठे गेले? मग काय तेवढाच हिंदुस्थान आहे किंवा तेवढेच हिंदू आहेत? आम्ही सर्वकाही करत होतो, पण तुम्ही आमच्यात गद्दारी केलीत. आमचे सरकार पाडलेत. तुमच्या व्यापारी मालकांचे बूट चाटण्यासाठी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपचं फडकं राष्ट्रध्वज नाही
कश्मीरमधील कलम 370 हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. तेव्हा यांनी एक निशाण, एक प्रधान, एक संविधान ही घोषणा दिली होती. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असले पाहिजे. निशाणही एकच असले पाहिजे, ते म्हणजे आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचे भांडी पुसण्याचे फडके असू नये. हे फडके म्हणजे आपला राष्ट्रध्वज नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला ठणकावले.
मराठा मराठेतर यांना उचकवून सत्ता
मागील विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं. आपल्याला वाटले हे हिंदू-मुस्लिम करतील त्यांनी हे केलेच. पण त्यांनी मराठी व मराठीतेतर धोरणही राबवले. गुजरातमध्ये मागच्यावेळी पटेल यांना आपटेल अशी स्थिती झाली होती. पण त्यांनी पटेलेतरांना एकत्र केले. हरयाणात जाटांना भडकावून जाटेतरांना एकत्र करून सत्ता मिळवली. महाराष्ट्रातही त्यांनी तेच केले. मराठ्यांना उचकवले आणि मराठेतरांना एकत्र करून सत्ता प्राप्त केली. त्यामुळेच दिल्लीचे गुलाम आज आपल्यावर राज्य करायला लागलेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जय गुजरात, किती लाचारी करणार
काल तो एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चरमधला हिरो झुकेगा नही साला असे म्हणतो. पण हे लोक उठेगा नही साला असे म्हणतात. कुछ भी बोलो उठेगाही नही. अरे कसे उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखे. मी विचार म्हणतोय… हिंदी भाषेला विरोध न करणारा आणि ‘जय गुजरात’ म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कसा असेल, असा टोला शहा सेनेच्या मिंधेंना उद्धव ठाकरे यांनी लगावला.
इकडे घाण व तिकडे स्टार ऑफ घाना
आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहेत. काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना… इकडे घाण व तिकडे स्टार ऑफ घाना… पण एका बाजूला मोदींचा फोटो व दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याचा फोटो. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरून सुनावले.
आम्ही आमच्या घरामध्ये हक्काची गोष्ट करतो
देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही, असे तुम्ही म्हणत आहात. एक मराठी माणूस असा दाखवा देशात इतर राज्यात गुंडगिरी करू शकतो. इतर राज्यात जाऊन भाषिक दादागिरी केली तर उभा चिरून टाकतील तिथले लोक, बंगालमध्ये, तामीळनाडूत जाऊन बघा. आम्ही आमच्या घरामध्ये न्याय्य हक्काची गोष्टी करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार
आज पेपरमध्ये बातमी आली आहे. लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद झाले आहे. बसा बोंबलत आता. त्याहून अधिक भयानक गोष्ट म्हणजे आपल्या देशात सर्वात कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही
आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही. पण मारुती स्तोत्र आम्हाला का विसरवायला लावता? आमचा जय श्रीरामला विरोध नाही. पण भेटल्यानंतर राम-राम म्हणणारे आम्हीच मराठी आहोत. समर्थ रामदासांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमचे डाव आता उधळून लावणार
इथेसुद्धा काही अमराठी आले असतील. आपल्या सगळ्यांचे अमराठी लोकांशी मैत्रीचे नाते असल्याचे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले त्यांच्याशी आम्ही गुण्यागोविंदाने एकत्र नांदलो, राहिलो तर आपली पोळी भाजली जाणार नाही म्हणून तुम्ही आमच्यात विषाचा खडा टाकत आहात. हे तुमचे डाव आम्ही उधळून लावू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
भाजपकडून महाराष्ट्राभिमान शिकायचा का?
भाजप कोणत्याही लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही तो नव्हता. भाजप हा सर्वात शेवटी आला आणि सर्वात अगोदर बाहेर पडले. आम्ही त्या भाजपकडून देशाभिमान व महाराष्ट्राभिमान शिकायचा का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्ही मराठी व महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार
भाजपवाले मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. अख्खी मुंबई एका व्यक्तीच्या घशात घालत आहेत. आज मुंबईतील सर्वात जास्त जागा यांच्या मालकाचा मित्र आहे तो म्हणजे अदानी याची आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेली मुंबई आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. यापुढे आम्ही मराठी व महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
भाजपवाले नवरा-बायकोत भांडणे लावतील
भाजपवाल्यांना लग्नाला बोलावू नका. ते येतील श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा-बायकोत भांडणे लावून दुसऱ्या लग्नाला जेवायला जातील. एवढे केले तर पुरे. पण ते पोरगीच पळवून घेऊन जातील. कारण, यांचे स्वतःचे असे काहीच नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
षंढाचे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं
ज्या राज्यामध्ये राहता, ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, तिचे जर कुणी धिंडवडे काढणार असतील आणि आपण पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पालख्या वाहणार असू तर असे षंढाचे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्र हा शूरांचा, वीरांचा आहे, दगडांचा आहे. पण यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी हिंदीची सक्ती करू देणार नाही
‘वन नेशन वन इलेक्शन’चं एक नवीन टुमणे आता त्यांनी काढले आहे. म्हणजे हळुवारपणे सगळे एकेक करत हिंदी, हिंदू, हिंदुस्थान, असं त्यांचं धोरण आहे. हिंदू आणि हिंदुस्थान आम्हाला मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही समित्या लावा, हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही करू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
अनाजी पंतांनी आमच्यातला अंतरपाट दूर केला!
मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून मराठी माणसाची एकजूट दाखवली त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. पण एक गोष्ट नक्की. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
आम्ही एकत्र दिसणे महत्त्वाचे!
आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण आज आमच्या भाषणांपेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. आज सर्वांनी मराठी भाषेसाठी वज्रमूठ दाखवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता. 1992-93 साली जे काही घडले, तेव्हा आमच्या शिवसैनिकांनी अमराठी माणसांना वाचवलं!
मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू.
हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेली मुंबई आपण राखू शकणार नसू, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे आपण रक्ताची शपथ घेऊन आपण मुंबई व मराठीच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे.
आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ!
भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय, आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचे आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार, असे उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला ठणकावले.
मराठी माणसाच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि मराठीसाठी आम्ही गुंडच आहोत
भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत, आहोत आम्ही गुंड. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
प्रबोधनकारांचे वारसदार म्हणून तुमच्यापुढे उभे ठाकलो आहोत
एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी! मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्या प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे ठाकलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
अभिमानाने सांगेन, मी महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली
मी अभिमानाने सांगेन की, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी इथे बसलेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती. त्याचा मला अभिमान आहे. काय केले त्याचे तुम्ही. महाराष्ट्रात मराठीची सक्ती का करावी लागली? कोण आमच्या मराठीचे दुश्मन आहेत. पण महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतरही काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नाही काय? आता कोण तरी भेडिया… ही यांची पिलावळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
म फक्त महापालिकेचा नाही, म मराठीचा आणि म महाराष्ट्राचा… राज्य काबीज करू!
यांचा म मराठीचा नाही, तर महापालिकेचा आहे असे काही जण म्हणत आहेत. त्यांना मी एकच सांगतोय, आमचा म नुसता महापालिकेचा नाही, तर म मराठीचा आणि म महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबीज करू, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली. सत्ताप्राप्ती हे आमचे कधीच ध्येय नव्हते. सत्ता येते आणि सत्ता जाते. आपली एकजूट महत्त्वाची आहे, या शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीचे त्यांनी स्मरण केले.
आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर एकदा आमची शक्ती तुम्हाला अशी दाखवू की तुम्ही पुन्हा आपले डोके वर काढणार नाही.
नुसत्या पालख्यांचे भोई होणार की तुम्ही आपल्या मराठीला सन्मानाने पालखीत बसवणार आहात.
शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. एक तर कुणावर अन्याय करू नका. पण तुमच्या अंगावर कुणी हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका.