एकनाथ पवार-saptrang@esakal.com
वेळ साधली तर क्रांती घडविता येते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. अर्थात हे गणित फार कमी जणांना जमते. हे तंत्र एका अख्ख्या गावाने अवगत करून कायापालट केला, असे सांगितल्यास विश्वास नक्कीच बसणार नाही; पण सिंधुदुर्गातील वेतोरे (ता. वेंगुर्ले) गावाने ही किमया साधली आहे. कोणत्या वेळी काय विकायला हवे, याचे गणित जुळवून त्यांनी आंबा, काजू, भाजीपाला, कणगर या पारंपरिक पिकांच्या मदतीने गावाचे अर्थकारणच बदलून टाकले. यातून तयार झालेला शेतीचा ‘वेतोरे पॅटर्न’ नक्कीच मार्गदर्शक ठरतो आहे.
वेंगुर्ले तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले वेतोरे हे एक हजार ९२५ लोकवस्तीचे गाव. गावातून ‘अनामिका’ नदी वाहते. या गावातील जमीन रेताड आणि भुसभुशीत. आजूबाजूच्या गावांप्रमाणे आंबा, काजू हेच येथील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत असून भात, नाचणी अशी पिके येथील शेतकरी पूर्वीपासून घेतात. पिकांमध्ये फारसे बदल न करता त्यांचे उत्पन्न नेमके कोणत्या काळात मिळेल? याचा अभ्यास करीत इथल्या शेतकऱ्यांनी गावच्या अर्थकारणात क्रांती घडविली.
संबंधित पीक बाजारात ज्या काळात येते, त्याच्या आधी वेतोरेतील हंगाम सुरू होतो आणि मार्केट मिळवून जातो. हेच सूत्र गेली काही वर्षे अगदी शिस्तीने पाळत वेतोरेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. येथील जमीन आंबा, काजू आणि भातशेतीखाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे आंबा, काजू लागवडीखाली एक ते दोन एकर जमीन आहे, तर भातशेतीखाली दहा गुंठ्यांपासून अर्धा एकरपर्यंत जमिनी आहेत. गावातील शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीचे प्रमाण तुलनेत खूपच कमी आहे; परंतु आमच्याकडे जमीन नाही, पाणी नाही, शेतीला पोषक वातावरण नाही, असे रडगाणे इथल्या गावकऱ्यांनी कधीच गायले नाही. साधारण वीस वर्षांपूर्वी गावात हे बदल सुरू झाले.
पीक पद्धतीचे नियोजनगावकऱ्यांनी शेतीतूनच सुबत्ता कशी आणता येईल, याचा विचार सुरू केला. गावाच्या आजूबाजूला काही पडीक जमीन आहे का, याचा शोध घेतला. गावालगत अन्य गावांतील लोकांची पडीक जमीन होती. या जमिनी शेतकऱ्यांनी भाडेकरारावर घेतल्या. गावाची भौगोलिक रचना, जमिनीचा पोत, गावातील पाण्याची उपलब्धता, आंबा, काजूचा हंगाम, आजूबाजूच्या बाजारपेठेतील मागणीचा विचार करून गावातील लोकांनी पीक पद्धतीचे नियोजन केले.
गावात काय पिकविले तर त्याला जिल्ह्यातील तसेच जवळच्या विविध शहरांत बाजारपेठ मिळेल, याचा विचार तरुणांमध्ये सुरू झाला. सिंधुदुर्गात येणारा भाजीपाला इतर जिल्ह्यांतून येतो. त्यामुळे उत्तम दर्जाचा भाजीपाला गावात पिकवला तर स्थानिक बाजारपेठांमधून संपेल, या हेतूने गावात भाजीपाला लागवडीस सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला वेतोरेतील ३० ते ४० शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड क्षेत्रात धाडसाने पाऊल ठेवले. त्यापाठोपाठ शेकडो शेतकऱ्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवीत एक आगळीवेगळी क्रांती घडविली.
वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे मागणीशेतकऱ्यांनी वेलवर्गीय दोडका, पडवळ, काकडी, चिबुड (खरबूज गटातील फळ) मिरची अशी पिके घेतली. केवळ उत्पादन घेतले नाही तर विक्रीचे कौशल्य अंगीकारले. या शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी, बांदा बाजारपेठ काबीज केलीच; परंतु त्यानंतर गोवा राज्यातील बाजारपेठेत आपल्या दर्जेदार भाजीपाल्याने लोकप्रियता मिळविली. प्रत्येकाकडे जमिनीची कमतरता होती. त्यामुळे बाजूच्या तेंडोली, गोवेरी या गावातील दीडशे ते दोनशे एकर जमीन वेतोरेतील तरुण शेतकऱ्यांनी कराराने घेतली. भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढले तसे उत्पादनही वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावंतवाडी, तसेच गोवा येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली.
एकमेकांमधली स्पर्धा टाळलीवेतोरेतील भाजीपाल्याला वैशिष्ट्यपूर्ण चव असल्यामुळे गोव्यात मोठी मागणी वाढली. शेतमालाची शेतकरी थेट विक्री करीत असल्यामुळे त्यांना चांगला फायदा या पिकातून मिळू लागला. भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यातून शेतमालाला भाव कमी मिळतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी स्वतःसाठी एक अलिखित नियमच तयार केला. एकमेकांशी स्पर्धा न करता समन्वयाची भूमिका घेतली. जिथे एक शेतकरी जात असेल, त्या ठिकाणी गावातील दुसरा शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी जात नाही. तो दुसऱ्या बाजारपेठेत जातो. त्यामुळे आपसातील स्पर्धा टळली. पर्यायाने भाजीपाल्याला दरही चांगला मिळाला. भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी प्राप्त झाली.
बाजारपेठेचे अचूक नियोजनशेतीमध्ये वेळेला किती महत्त्व आहे, हे वेतोरेतील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच समजते. येथील शेतकऱ्यांनी कोणत्या महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी, याचा सखोल अभ्यास केला आहे. संबंधित पिकाची बाजारपेठेत येण्याची पारंपरिक वेळ त्यांना कळली. त्यानंतर वेतोरेतील संबंधित पीक पारंपरिक वेळेआधी महिना ते पंधरा दिवस आधी येईल, असे लागवड वेळापत्रक तयार करून त्यावर अंमल सुरू झाला. त्यामुळे कृषिमालाला चांगले मार्केट मिळण्यासाठी फारसे वेगळे प्रयत्न करण्याची गरज राहिली नाही. ज्या जमिनीत भातपीक उत्पादन घेतले जाते, त्या पिकाची कापणी केल्यानंतर त्याच जमिनीत भाजीपाला उत्पादन घेतले जाते. भाजीपाला लागवड ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. ज्या वेळी जिल्ह्यात कुठेही भाजीपाला उपलब्ध नसतो, अशा वेळीच तो बाजारपेठेत आला पाहिजे, याचे नियोजन केले जाते. कुठेही मुळा, पालेभाज्या नसल्यामुळे भाजीपाल्याला दर चांगला मिळतो. महिना-दीड महिन्यांतच भाजीपाला उत्पादन संपविले जाते. वेतोरेत आंबा, काजू या दोन्ही फळपिकांची मोठी लागवड आहे. त्यामुळे मार्चपासून आंबा, काजूचा हंगाम सुरू होतो. जमीन कमी असल्यामुळे वर्षभरात कमीत कमी तीन पिके घेता येतील, असे नियोजन केले जाते.
कणगर कंदाने उलाढाल वाढलीभाजीपाला पिकातून सात कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल होते. जिल्ह्यासह गोव्याच्या बाजारपेठांमधून भाजीपाला विक्री करताना येथील शेतकऱ्यांना बाजारपेठांची मागणी लक्षात आली. यातूनच कणगर (कणगी) या कंदाला मोठी मागणी गोव्यात असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे येथील शेतकरी कणगर शेतीकडे वळले. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनेच ही शेती करावी लागत असल्यामुळे त्याला खर्च देखील कमी येतो. एका पाठोपाठ एक शेतकरी कणगर लागवडीकडे वळू लागला. व्यापारी गावात येऊन चांगला दर देऊन कणगर खरेदी करीत असल्यामुळे मालाच्या खपाची चिंता शेतकऱ्यांना नव्हती. सध्या गावात २० ते २५ हेक्टर क्षेत्र कणगर लागवडीखाली आहे. २० हेक्टर लागवड केलेल्या कणगरपासून सुमारे ४ कोटी रुपयांची उलाढाल होते.गावातील १५० हून अधिक शेतकरी कणगर शेती करतात. त्यातील काही शेतकरी ‘सुरण’ या कंदाची लागवड सुद्धा करतात. गोव्यात या दोन्ही कंदांना मोठी मागणी आहे.
करिअरचे नवे विश्व
गावातील ४०० हेक्टर क्षेत्र आंबा तर २२५ हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली आहे.
आंब्याची सुमारे ४० हजार तर काजूची ४५ हजार झाडे आहेत.
आंबा, काजू लागवड केल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीची तीन वर्षे आंतरपीक म्हणून भाजीपाल्यासह विविध पिके घेतली जातात.
आंबा, काजूची या गावाची उलाढाल देखील कोट्यवधींची आहे.
कोकणातील बहुसंख्य गावांतील तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूरसह विविध शहरांकडे धावत असतो, परंतु त्याला वेतोरेतील तरुण अपवाद आहेत. त्यांनी शेतीतच करिअर केले आहे. शेतीतून आर्थिक समृद्ध होता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
शेती, बागायती, शेतीपूरक व्यवसायातून गावाची २५ कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते.
वेतोरेचे अर्थकारण
भाजीपाला उलाढाल
दीडशे ते दोनशे एकरवर दोन टप्प्यांत लागवड
आर्थिक उलाढाल
७ कोटी
कणगर लागवड
२०
हेक्टरवर
आर्थिक उलाढाल
४
कोटी
दुग्ध
व्यवसाय
वार्षिक संकलन ७२ हजार लिटर
आर्थिक उलाढाल
२७ लाख
आंबा, काजू लागवड
६२५
हेक्टर
आर्थिक उलाढाल
१५ कोटी