Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल
esakal July 06, 2025 09:45 AM

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटला असून चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले या भाविकाला महापूजा करण्याचा मान मिळाला.

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे वीस लाखाहून अधिक भाविकांची पंढरपुरात मांदियाळी झाली आहे. पंढरी नगरीत सर्वत्र विठू नामाचा जयघोष सुरू असून मठ आणि मंदिरांमध्ये टाळ-मृदुंगाचा गजर आहे. अवघी पंढरी नगरी विठू नामाच्या भक्तीरसात न्हाहून निघाली आहे.

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झाले आहेत. चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचे व कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली. दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत सुमारे 75 हजाराहून अधिक भाविक उभे आहेत.

यावर्षी मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर, मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने मंदिर परिसरात एकेरी वाहतूक केली आहे. त्यामुळे संत नामदेव पायरी, चौफाळा विठ्ठल मंदिर या भागात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवता आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.