Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग
esakal July 06, 2025 09:45 AM

पंढरपूर : आषाढी एकादशीच्यामंगलमय दिवशी संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिभावाने न्हालेली असताना, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात पांडुरंगाच्या नगरीत अनोखे दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पारंपरिक फुगडीचा फेर धरून उपस्थित भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी दाखल झाले आहेत. महापूजेनंतर एका कार्यक्रमात या दाम्पत्याने सहभागी होत भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात पारंपरिक फुगडी खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले.

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

या उत्साही आणि भक्तिभावाने भरलेल्या क्षणामुळे पंढरपूरमधील आषाढी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिगीतांच्या गजरात झालेला हा फुगडीचा क्षण पंढरपूरच्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणारा ठरला.

पंढरपूर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा भाग आहे. येथे दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यंदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. राज्याचे आठ ते दहा मंत्रीदेखील सध्या पंढरपुरात उपस्थित आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.