पाटणा : भाजपचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक गोपाळ खेमका यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाइकवरून आलेल्या दोन व्यक्तींनी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
सहा वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यात त्यांचा मुलगा गुंजन खेमका यांचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती. दरम्यान, हत्येच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.खेमका यांच्या हत्येने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे पुनरावलोकन करण्यासाठी बैठक बोलावली होती.
त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खेमका हत्येची चौकशी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पाटणा सेंट्रलच्या पोलिस अधीक्षक दीक्षा यांनी घटनेविषयी पत्रकारांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘शुक्रवारी रात्री गोपाळ खेमका घरी परतत असताना हॉटेल पनाशेजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांचे निवासस्थान या हॉटेलच्या शेजारी असलेल्या सोसायटीत आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. स्थानिक पोलिस ठाणे आणि गस्तीवर असलेल्या वाहनांतील पोलिस घटनास्थळी पोचले. फॉरेन्सिक तज्ज्ञ पुरावे गोळा करत आहेत आणि सीसीटीव्ही फूटेजचाही अभ्यास केला जात आहे. घटनास्थळावर एक गोळी आणि काडतूस आढळले आहेत.’’
कोण होते गोपाळ खेमका?गोपाळ खेमका बिहारमधील आरोग्य सेवा क्षेत्रातील नामांकित उद्योजक होते. पाटण्यामधील मगध रुग्णालयाचे ते मालक होते. सोबतच पाटणामध्ये त्यांची अनेक औषधांची दुकाने आहेत. त्याव्यतिरिक्त हाजीपूर येथे त्यांच्या दोन कार्डबोर्ड तयार करण्याच्या फॅक्टरी आहेत. पाटणाच्या एक्झिबिशन रोडवर त्यांच्या मालकीचा पेट्रोल पंप असून, हाजीपूर इंडस्ट्रियल परिसरातही त्यांच्या फॅक्टरी आहेत; तसेच त्यांचे इतरही अनेक व्यवसाय आहेत आहेत.
पोलिसांवर ठपका‘घटना झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले,’ असा आरोप गोपाळ खेमका यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी केला आहे. बिहारचे पोलिस महानिरीक्षक विनय कुमार यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी या हत्येवरून बिहार सरकारवर टीका केली आहे. अपक्ष खासदार पप्पू यादव यांनीही राज्य सरकारवर टीका केली. “बिहार हे गुन्हेगारांचे अभयारण्य बनले आहे. नितीशजी, कृपया बिहारला वाचवा,” अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर शेअर केली आहे.
Nagpur News: शहरातील उड्डाणपुलाखाली तयार होतेय क्रीडांगण; युवकांना आऊटडोअर्स गेम्स खेळण्यासाठी मिळणार प्रेरणा, मनपाचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी खेमका यांच्या मुलाचीही हत्याडिसेंबर २०१८ मध्ये गोपाळ खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. गुंजन खेमका त्याच्या गाडीतून फॅक्टरीत आला. फॅक्टरीमध्ये पोचताच सुरक्षा रक्षकाने फॅक्टरीचे गेट उघडले आणि हल्लेखोरांनी गाडीच्या खिडकीतून गुंजन याच्यावर बेछूट गोळीबार केला. गोपाळ खेमका यांना आणखी एक मुलगा असून, तो डॉक्टर आहे.