मुंबईमध्ये वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी महोत्सव पार पडला. 19 वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्र आले. मनसे आणि उद्धव सेना एका मंचावर आल्याने राज्याच्या राजकारण कूस बदलण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मेळाव्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा होत आहे. टीका होत आहे. ठाकरेंवर भाजप आणि शिंदे गोटातून तिखट प्रतिक्रिया येत आहे. त्यातच टीका करताना शिंदे सेनेचे शिलेदार आमदार संजय गायकवाड यांची दाखला देताना जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय केले वादग्रस्त वक्तव्य
आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, केवळ हिंदीचा विषय नाही. परराज्यात गेल्यावर हिंदी भाषा तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्हाला जगात टिकायचं असेल तर, सगळ्याच भाषा अवगत असायला हव्यात. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काय मूर्ख होते का? डोके ताळ्यावर न ठेवता त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
उर्दू भाषा पण यायला हवी
भाषेवरून राजकारण करणं चुकीचं आहे. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल तर उर्दू भाषा पण आपल्याला यायला हवी असे ते म्हणाले. लातूर येथील हाडोळती येथे ते आले होते. भाषेवरून राजकारण करणं चुकीचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे.
ठाकरे ब्रँडवर तोंडसुख
संजय गायकवाड यांनी ठाकरे नावाचा ब्रँड राहिला नसल्याचे म्हटले आहे. असा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच 288 आमदार निवडून आले असते. त्यावेळी 70 ते 74 जागा निवडून आल्या असता, असा घणाघात गायकवाड यांनी केला. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पण टीका केल्याचे बोलले जात आहे.