ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे १७ वी ब्रिक्स शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक प्रशासन व्यवस्थेवर महत्वाचे वक्तव्य केले. परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २० व्या शतकात स्थापन झालेल्या जागतिक संस्थांमध्ये दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व नाही. जोपर्यंत या देशांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट केले जात नाही, तोपर्यंत या संस्था कुचकामी राहतील.
ब्रिक्समध्ये काळानुसार बदलब्रिक्सचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला यांचे आभार मानले. ते म्हणाले, ब्रिक्समधून मिळालेली नवी ऊर्जा शब्दात व्यक्त करता येणार नाही. ब्रिक्स कुटुंबात इंडोनेशियाचा समावेश झाला आहे. ब्रिक्सचा विस्तार आणि नवीन मित्रांची भर पडणे हे याचा पुरावा आहे. ब्रिक्स ही एक अशी संघटना आहे, जी काळानुसार स्वतःमध्ये बदल करत आहे. आता आपल्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि बहुपक्षीय विकास बँका यासारख्या संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
या संस्था नेटवर्क नसलेल्या मोबाईलजागतिक संस्थांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या संस्था संघर्ष थांबवू शकत नाहीत किंवा ते साथीच्या रोगाचा आणि आर्थिक संकटाचा सामना करण्यास सक्षम नाहीत. तसेच सायबर हल्ले या सारख्या नवीन धोक्यांवर कोणताही उपाय देऊ शकत नाहीत. ग्लोबल साउथशिवाय या जागितक संस्था सिम कार्ड असलेल्या पण नेटवर्क नसलेल्या मोबाईलसारख्या वाटतात. यामुळे ग्लोबल साउथचा आवाज जागतिक संस्थांमध्ये समाविष्ट केला पाहिजे.
नरेंद्र मोदी यांनी भारताचा उल्लेख करत सांगितले की, भारताने नेहमी मानवतेच्या विकासासाठी कार्य केले आहे. भारताने कधी केवळ आपला स्वार्थ पाहिला नाही. आम्ही भागीदारांसोबत काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत. एआयच्या युगात तंत्रज्ञान दर आठवड्याला अपडेट केले जाते. परंतु जागतिक संस्थांमध्ये ८० वर्षांतून एकदाही बदल केला गेला नाही. २० व्या शतकातील टाइपरायटर २१ व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवू शकत नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.