IAS आणि IPS अधिकाऱ्यांची ट्रेनिंग कुठे होते? जाणून घ्या या खास ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती
Tv9 Marathi July 07, 2025 10:45 PM

भारतामध्ये युपीएससी (UPSC) ही परीक्षा सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार हे स्वप्न उराशी बाळगून या परीक्षेला बसतात की त्यांना आयएएस (IAS), आयपीएस (IPS) किंवा आयएफएस (IFS) अधिकारी व्हायचं आहे. पण यशस्वी होणाऱ्यांची संख्या अगदी मोजकीच असते. यशस्वी उमेदवारांची सेवा त्यांच्या मेरिट रँकनुसार ठरते. त्यानंतर येतो त्यांचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा प्रशिक्षण (Training).

युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची प्राथमिक ट्रेनिंग लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी इथे होते. हे एक अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. येथे ऑल इंडिया सर्व्हिसेससह ग्रुप A सेंट्रल सर्व्हिसेसच्या नव्या अधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा फाउंडेशन कोर्स दिला जातो.

या फाउंडेशन कोर्समध्ये प्रशासन, व्यवहारज्ञान, सहकार्य, नेतृत्व गुण, शारीरिक तंदुरुस्ती आणि नागरी सेवा मूल्ये यांचा समावेश असतो. याच कोर्समध्ये देशभरातून निवडले गेलेले IAS, IPS, IFS आणि इतर सेवा वर्गातील अधिकारी एकत्र येतात. हे तीन महिने त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो.

फाउंडेशन कोर्सनंतर IAS अधिकाऱ्यांची ट्रेनिंग पुन्हा LBSNAA मध्येच चालू राहते, पण IPS अधिकाऱ्यांसाठी पुढील ट्रेनिंग सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी (SVPNPA), हैदराबाद येथे होते. येथे IPS अधिकाऱ्यांना 11 महिन्यांचं सखोल प्रशिक्षण दिलं जातं.

या ट्रेनिंगमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शस्त्रप्रशिक्षण, कायदे, गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हेगारी, जनसंपर्क, नेतृत्व, स्ट्रॅटेजी आणि रिअल-टाइम सिम्युलेशन या सारख्या गोष्टी शिकवल्या जातात. या टप्प्यानंतर IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित राज्य कॅडरमध्ये प्रतिनियुक्त केलं जातं.

ट्रेनिंग खर्च किती?

LBSNAA मधील प्रशिक्षक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाचा खर्च अत्यंत कमी लागतो. एका अधिकाऱ्याला सिंगल रूमसाठी दरमहा फक्त ₹350 शुल्क भरावं लागतं. जर दोन जणांसाठी रूम असेल, तर ते फक्त ₹175 प्रति व्यक्ती भरतात. यात वीज, पाणी यांचाही समावेश असतो. मेसचा एकूण खर्च सुमारे ₹10,000 असतो.

तसेच, प्रशिक्षकांना हॉस्टेलमध्ये निवास, जिम, सायकलिंग ट्रॅक, क्रीडा संकुल, संगणक सेवा, पुस्तकालय, वैद्यकीय सेवा आणि अन्य आधुनिक सुविधा मोफत मिळतात. या सुविधांमुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी आणि सर्वांगीण घडवणारे ठरते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.