बाईक किंवा कार चालवताना तुमच्या गाडीच्या मागे कुत्रे लागल्याचा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. अनेकदा हे कुत्रे जोरजोरात भुंकतात आणि वाहनाच्या मागे धावतात. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटते. तसेच लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते.
यामुळे अनेकदा तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, कुत्रे एखाद्या बाईकच्या किंवा कारच्या मागे का लागतात? कुत्र्यांच्या अशा वागण्यामागचे नेमके कारण काय? आपण यामागचे कारण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
श्वान तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक कुत्र्याचा प्रदेश ठरला असतो. कुत्रे तुमच्यामुळे नव्हे, तर गाडीच्या टायरभोवती धावतात. ज्यावर काही कुत्र्याने आपला वास सोडलेला असतो. ते इतर कुत्र्यांना आपला शत्रू मानतात.
जेव्हा त्यांना तुमच्या गाडीच्या टायरमधून दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो, तेव्हा त्यांना वाटते की त्यांच्या हद्दीत नवीन कुत्रा आला आहे. त्यानंतर ते आक्रमक होतात आणि मग ते त्या गाडीच्या टायरचा पाठलाग करण्यासाठी तुमच्या गाडीच्या मागे भुंकतात. तसेच जोरजोरात धावतात.
आता निश्चितच तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कुत्र्यांना नेमका कसला वास येतो, ज्यामुळे ते गाडीच्या मागे धावत असावेत. अनेकदा तुमच्या गाडीच्या टायरवर एखादा कुत्रा लघवी करतो, त्याचा वास कुत्र्यांना येतो आणि त्यामुळे ते मागे धावतात.
जर तुमच्या गाडीच्या टायरवर कुत्र्याने लघवी केली नसेल किंवा त्याला वास येत नसेल तर कुत्री गाडीच्या मागे धावत नाहीत, हे लक्षात ठेवा.
जर तुमच्याही गाडीच्या मागे कुत्रे भुंकत किंवा मागे लागत असतील तर त्यावेळी घाबरु नका. यावरील सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग हळू करा. अनेकदा असे केल्याने कुत्री भुंकणे. तसेच तुमच्यामागे धावणे थांबवतात.
त्यासोबतच हिंमत करुन आपले वाहन थांबवा. त्यामुळे कुत्रे आपोआप शांत होतात. ते शांत झाल्यावर हळूहळू तुमच्या वाहनाचा वेग वाढवा. त्या भागातून बाहेर पडा. शांतता आणि संयम ठेवल्यास हे प्रसंग टाळता येतात.