भारताच्या ड्रोनमध्ये चीनी पार्ट्स नसणार, मोदी सरकारची नेमकी तयारी काय?
Tv9 Marathi July 06, 2025 06:45 PM

देशात तयार होणाऱ्या ड्रोनमध्ये चीनी पार्ट्सचा वापर केला जाणार नाही. यासंदर्भात भारतीय सैन्याकडून कठोर नियम तयार करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात हा नियम लागू होणार आहे. भारतीय संरक्षण व्यवस्थेत कुठेही लूप होल राहू नये, यासाठी ही तयारी केली जात आहे. मागील काही वर्षांपासून चीनसोबत सीमेवर तणाव वाढला आहे. तसेच चीन पाकिस्तानला नेहमी मदत करत असतो. या परिस्थितमध्ये सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोनची खरेदी केली जात आहे. यामुळे हे ड्रोन पूर्णपणे सुरक्षित असावे, यासाठी हा नियम बनवण्यात येत आहे.

ड्रोनची होणार कसून तपासणी

लष्करी अधिकारी मेजर जनरल सी.एस. मान यांनी सांगितले की, हा नियम जवळजवळ तयार आहे. तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा नियम मंजूर होताच आमच्या ड्रोनमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत. तसेच हा नियम बनवल्यानंतर ड्रोनची कसून तपासणी केली जाईल, जेणेकरून त्यात काही दोष आहे की नाही हे तपासता येईल.

सॉफ्टवेअर किती सुरक्षित

भारत आणि पाकिस्तान दरम्यान संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामुळे ड्रोनमध्ये असणाऱ्या चीनी पार्ट्सची तपासणी करणे किती गरजेचे आहे, हे समोर आले. नवीन नियमानुसार, भारतातील जी कंपनी ड्रोन बनवत आहे, त्या कंपनीने चीनी पार्ट्स वापरले आहे का? त्याची कठोर तपासणी होणार आहे. ड्रोनच्या प्रत्येक भागाची तपासणी केली जाणार आहे. ड्रोनमध्ये वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर किती सुरक्षित आहे, ते सुद्धा तपासले जाणार आहे.

ड्रोनमध्ये चीन पार्ट्स न वापरण्याचा नियम पुढील काही महिन्यात लागू होणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ते महत्वाचे असणार आहे. या नियमानुसार ड्रोन बनवणाऱ्या कंपनीला ड्रोनमध्ये कोण कोणते पार्ट्स लागले आहे, त्याची माहिती द्यावी लागणार आहे. लष्कराकडून त्या पार्ट्सची तपासणी करण्यात येणार आहे. ड्रोन पूर्ण सुरक्षित आहे, त्यात गुप्तरित्याही कोणताही धोका नाही, हे लष्कराकडून तपासण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.