गेल्या २० वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण अखेर आज आला. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. यानिमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यानंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली असे बोललं जात आहे. आता यावरुन सामना वृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मुंबईला गुजरातची गुलाम करण्याचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचं धोरण, अशा शब्दात सामनातून घणाघात करण्यात आला.
सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून भाजपसह महायुतीवर निशाणा साधण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला रोखण्यासाठी उद्धव व राज यांनी एकत्र यावे. ते एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होईल आणि ते कधीच भरून निघणार नाही ही भावना वाढत गेली. नारायण राणे, एकनाथ शिंदे व भाजपमधील ‘बाटगे’ ठाकऱ्यांच्या एकत्र येण्यावर शिमगा करीत राहिले, पण एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी भाजपचे बूटचाटे धोरण स्वीकारून मराठी माणसाची एकजूट फोडली, असा आरोप ठाकरे गटाने केला.
सरकारने माघार घेतली हे महत्त्वाचेमराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्रात चांगल्या स्थितीत नाही. त्यामुळे आधी ठाकऱ्यांची व नंतर मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती कायद्याने महाराष्ट्रासाठी एकच महत्त्वाचे घडले ते म्हणजे मराठी अस्मितेसाठी अवघा मराठी माणूस एक झाला व या मराठी जनांच्या रेट्यामुळे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर आले. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भवितव्यासाठी हे चित्र आशादायी आहे. हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्ध महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ‘भाषायुद्ध’ भडकले. दक्षिणेची राज्ये तर हिंदीविरोधात ‘मरू किंवा मारू’ या त्वेषाने उभी राहिली. महाराष्ट्राने विरोध सुरू केला, पण याप्रश्नी ‘ठाकरे’ एकत्र येऊन मराठी माणसाचे नेतृत्व करीत आहेत या बातमीनेच सरकारने माघार घेतली हे महत्त्वाचे, असेही रोखठोकमध्ये नमूद करण्यात आले.
मराठी माणसाला आपापसात लढवण्याचे उद्योग सुरूमराठी माणूस एकवटला व त्याचे नेतृत्व ‘ठाकरे’ यांनी केले तर काय घडू शकते, हे यानिमित्ताने दिसले. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे मुंबईतील आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी भाजपने ‘शिवसेना’ फोडली. मराठी माणसाला आपापसात लढवण्याचे उद्योग सुरू केले. यात पैशांचा खेळ मोठय़ा प्रमाणावर सुरूच आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढय़ामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही याबद्दल त्यांच्या मनात खदखद आहे. आमच्या सत्ताकाळात ‘मुंबई’ला गुजरातची गुलाम करू हे त्यांचे धोरण आहे. महाराष्ट्राचा अभिमान ठरलेली सर्व शासकीय कार्यालये मुंबईतून हलवली गेली आहेत. त्यातील डायमंड बाजार, एअर इंडिया वगैरे मुंबईतून गुजरातमध्ये सरकवली, असा घणाघात ठाकरे गटाने केला.
ठाकरे एकत्र येत आहेत या भरवशावरमोदी, शहा, फडणवीस यांच्या काळात मराठी माणूस जणू सत्ताधाऱ्यांचा गुलाम झाला. तो स्वतःचे तेज आणि शौर्य विसरला. मालवणात शिवरायांचा पुतळा पहिल्यांदा पडला. दुसऱ्या वेळेस पुतळ्याखालच्या जमिनीस तडे गेले. तरीही मराठी माणूस गप्प राहिला. तो हिंदीच्या सक्तीने उसळला व ‘ठाकरे’ एकत्र येत आहेत या भरवशावर लढायला सज्ज झाला, असेही रोखठोकमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मराठी माणसांत आणि ठाकरे बंधूंमध्ये फूट पाडणे यातच दिल्लीचे हितराजकारणात उद्धव व राज ठाकरे यांचे मार्ग भिन्न आणि दोन टोकाचे झाले. अमित शहा यांनी पाडलेल्या फुटीनंतर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सहभागी झाली. राज ठाकरे हे भाजप, शिंदे गट वगैरेंशी प्रेमाचे चहापान करीत राहिले. अमित शहांना भेटण्यासाठी ते एकदा दिल्लीतही जाऊन आले, पण त्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला नाही आणि मनसेचा राजकीय पटही पुढे सरकला नाही. मराठी माणसांत आणि ठाकरे बंधूंमध्ये फूट पाडणे यातच दिल्ली आणि येथील व्यापारी राजकारणाचे हित आहे. मतदार याद्यांत लाखो परप्रांतीय नावे घुसवून भाजप व त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत. यात मनसेचाही पराभव झाला. मतांचा मराठी टक्का वाढवणे. त्यातून सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा निवडणुकांत एकीचे आव्हान उभे करणे यातच महाराष्ट्र हित आहे. विजयी जल्लोषाची मांडव परतणी मार्गी लागली तरच मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता येईल. नाहीतर ढोल-नगारे वाजतील, गर्जना झडतील, रणशिंगे फुंकली जातील. हा जोश तसाच राहायला हवा, असे आवाहनही यातून करण्यात आले.