चाकण, ता. ६ : पुणे- नाशिक महामार्गावरील, तसेच चाकणच्या प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पुण्यातून येणारे, तसेच चाकणहून पुण्यात जाणारे कॅबवाले ट्रीप रद्द करत आहेत. त्याचा फटका उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर, तसेच इतर नागरिकांना बसत आहे. वाहतूक कोंडीचे कारण देऊन ट्रीप रद्द करत आहेत, हा अनुभव अनेकांचा आहे.
चाकण (ता. खेड) येथील वाहतूक कोंडीत शनिवारी (ता. ५) सकाळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तळेगाव चौक ते आंबेठाण चौक या दरम्यान वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचारी त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. वाहतूक कोंडीचा फटका सामान्य नागरिकांपासून अगदी मंत्र्यांनाही दररोज बसत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मात्र केव्हा सुटणार? हा ही प्रश्न आहे. शनिवारी सुमारे पाच किलोमीटरवर पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूने लागलेल्या होत्या. दुपारनंतर वाहतूक थोडी सुरळीत झाली. याबाबत वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सांगितले की, ‘‘सकाळी थोडा वेळ माजी मंत्री वळसे पाटील वाहतूक कोंडीत अडकले होते, परंतु वाहतूक कोंडीतून लवकरच त्यांचे वाहन पुढे काढण्यात आले.’’
डॉ. अमोल बेनके यांनी सांगितले की, ‘‘पुण्यातून चाकण रुग्णालयात दररोज तज्ञ डॉक्टर येताना वाहतूक कोंडीमुळे खूप वैतागतात. रुग्णांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.’’
डॉ. राहुल राजे यांनी सांगितले की, ‘‘वाहतूक कोंडीमुळे पुण्याहून चाकणला जायचं म्हटलं चाकणहून पुण्याला यायचं म्हटलं तर कॅबवाले वाहतूक कोंडीची सबब सांगून ट्रीप रद्द करतात. त्यामुळे आम्हाला चाकणला यायला किंवा पुण्याला जायला मोठा उशीर होतो, अशी अवस्था दररोज अनेकांची आहे.’’