सांगवी फाटा-रक्षक चौक पदपथ अस्वच्छ
esakal July 06, 2025 11:45 PM

जुनी सांगवी, ता. ६ ः सांगवी परिसरातील पादचारी मार्गांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः सांगवी फाटा ते रक्षक चौक दरम्यानचे पदपथ सध्या अत्यंत अस्वच्छ आणि दुर्लक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. पदपथावर तुटलेल्या फांद्याचा कचरा, वाढलेले गवत, प्लास्टिकमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर पादचारी, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण करत असतात. मात्र, सध्या पदपथावर चालणे धोक्याचे आणि त्रासदायक बनले आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत. पावसाचे दिवस व गेली अनेक दिवसांपासून पदपथावरील स्वच्छता केली नसल्याने पदपथावर शेवाळे तयार झाले आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे यापूर्वीही तेथील पदपथ, भुयारी मार्गाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, याबाबत तक्रारी करूनही नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
पदपथावर घाण, गवत आणि फांद्या यामुळे चालणे अशक्य झाले आहे. प्रशासनाकडून हो, करू, केले जाईल अशी उत्तरे देतात. प्रत्यक्षात नियमित काम काहीच होत नाही. पदपथाची त्वरित साफसफाई करावी, वाढलेले गवत व फांद्या तत्काळ हटवाव्यात. कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे आरोग्य विभाग दापोडी सारख्या कष्टकरी चाळींच्या वस्तीत डेंगी विरोधी मोहीम राबवत असून कारवाई करत आहे. मात्र दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी आरोग्याच्यादृष्टीने दुर्लक्ष केले जात आहे.
- धम्मरत्न गायकवाड, नागरिक
PIM25B20062

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.