आता प्रवासातच मारा झणझणीत जेवणावर ताव! ट्रेनच नाही तर रेल्वे स्टेशनवर इतक्या स्वस्तात मिळणार थाळी, काय काय आहेत मेन्यूत?
Tv9 Marathi July 06, 2025 11:45 PM

Indian Railways Veg Meal Price : भारतात रोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. दूरचा प्रवास करणार अनेक प्रवासी आहेत. भारत हा मोठा देश आहे. एका टोकाहून दुसर्‍या टोकाकडे जायचे असेल तर किफायतशीर आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेचा पर्याय निवडतात. पण याकाळात जेवणाची योग्य व्यवस्था नाही झाली तर प्रवासातील मज्जाच हरवून जाते. ट्रेनमधील जेवण आणि अन्नपदार्थाविषयी अनेकदा तक्रारी पाहायला मिळतात. त्यातील मेन्यू योग्य नसणे. दर्जा नसणे. जेवणाला चव नसणे, अथवा त्यात प्राण्यांची शेपटी, झुरळ आढळणे असे प्रकार अनेकदा घडले आहेत. वंदे भारत असो की सुपरफास्ट ट्रेन प्रवासी वैतागले आहेत. त्यावर आता रेल्वे मंत्रालयाने एक तोडगा काढला आहे. प्रवाशांना प्रवासातच आता स्वस्तात जेवणाचा आस्वाद घेता येईल. रेल्वे मंत्रालयाने मेन्यू कार्डच शेअर केले आहे.

किफायतशीर प्रवास, स्वस्तात जेवण

किफायतशीर आणि आरामदायक प्रवासासाठी अनेक जण रेल्वेचा प्रवास योग्य मानतात. दूरच्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडण्यात येतो. पण प्रवासात रेल्वेचे जेवण योग्य वाटत नाही. ते महाग वाटत असल्याने मग प्रवासी स्टेशनवर जे मिळेल ते खातात आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. रेल्वेत अनेकदा निश्चित केलेल्या दरापेक्षा अन्न पदार्थांसाठी अधिक किंमत वसूल केली जाते. त्याविरोधात तक्रार कुठे करावी हे प्रवाशांना माहिती नसते. अथवा प्रवासात हे चालायचंच म्हणून अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पँट्रीतील प्रवाशांचे फावते.

ट्रेनमध्ये 80 रुपये शाकाहारी जेवण

रेल्वे मंत्रालयाने शाकाहारी थाळीविषयी एक ट्विट केले आहे. त्यानुसार रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या शाकाहारी थाळीची किंमत 70 रुपये तर ट्रेनमध्ये या जेवणासाठी प्रवाशांना 80 रुपये मोजावे लागतील. या थाळीत तांदळाचा भात, वरण, दही, दोन पराठे वा 4 चपात्या, भाजी आणि लोणचं देण्यात येईल. प्रवासी या थाळीसोबत इतर झणझणीत पदार्थ सुद्धा स्वस्तात मागू शकतात.

कर्मचाऱ्यांनी मनमानी केली तर तक्रार नोंदवा

अनेकदा रेल्वे कर्मचारी ट्रेनमध्ये सेवा देताना अन्नपदार्थांचे जादा दाम सांगतात. अथवा मेन्यू कार्डमध्ये दर दाखवत नाहीत. काही कर्मचारी अन्नपदार्थ उपलब्ध नसल्याचे सांगतात किंवा आवडते पदार्थ नसल्याची थाप मारतात. अशावेळी प्रवासी याविषयीची तक्रार दाखल करू शकतो. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या, रेल्वे विभागाच्या एक्स खात्यावर तक्रार करता येईल. अथवा प्रवासी हेल्पलाईन क्रमांक 139 वा रेल्वेवन या ॲपवर तक्रार नोंदवू शकतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.