अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कमबॅक केलं आहे. भारताने पहिला कसोटी सामना गमावल्याने या मालिकेत काही खरं नाही असंच वाटत होतं. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली. नाणेफेक गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडला 407 धावांवर रोखत 180 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा बेजबॉल पॅटर्न लक्षात घेऊन 427 धावांवर डाव घोषित केला. तसेच विजयासाठी 608 धावांचं लक्ष्य दिलं. भारताने इंग्लंडला 271 धावांवर रोखलं. आकाश दीपने इंग्लंडचे 6 गडी बाद केले. तर शुबमन गिलने दोन्ही डावात जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे हे दोघे खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयानंतर भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘पहिल्या सामन्यानंतर आम्ही ज्या गोष्टींबद्दल बोललो, त्या सर्व आम्ही अचूक होतो. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहण्यासारखे होते. आम्हाला माहित होते की जर आम्ही अशा प्रकारच्या विकेटवर 400-500 धावा केल्या तर आम्ही खेळात असू. प्रत्येक वेळी आम्ही इतके झेल सोडणार नाही. त्याने इतक्या मनापासून गोलंदाजी केली. त्याने ज्या भागात आणि लांबीवर चेंडू टाकले. तसेच दोन्ही दिशेने हलवत होता. अशा विकेटवर गोलंदाजी करणे कठीण आहे. मी म्हणेन की मला माझ्या खेळात आरामदायी वाटत आहे. जर आम्ही माझ्या योगदानाने मालिका जिंकली तर मला अधिक आनंद होईल. मी हे आधी सांगितले आहे, फलंदाज म्हणून खेळायचे आहे, फलंदाज म्हणून विचार करायचे आहे.’
तिसरा कसोटी सामना लॉर्ड मैदानात होणार आहे. हा सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? असा प्रश्न शुबमन गिलला विचारला. त्यावर त्याने सांगितलं की, निश्चितच खेळणार आहे. तसेच लॉर्ड्सवर खेळण्यास खूप उत्सुक असल्याचं देखील गिलने सांगितलं. गिलच्या वक्तव्यानंतर लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराह खेळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मधून प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कापला जाणार हे जवळपास निश्चित आहे.