आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने केलेल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर भारतीय कसोटी संघाने इंग्लंडच्या भूमीत शुबमन गिल याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा बर्मिंगहॅममधील दुसर्या कसोटी सामन्यात 336 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गोलंदाजांनी इंग्लंडला 68.1 ओव्हरमध्ये 271 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बर्मिंगहॅममध्ये पहिलावहिला विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. भारताने अशाप्रकारे लीड्समधील पहिल्या पराभवाची परतफेड केली.
भारताने असा जिंकला सामनाइंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या ऐतिहासिक द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारला. शुबमनने 269 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 87 तर रवींद्र जडेजा याने 89 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 42 आणि करुण नायर याने 31 धावा जोडल्या. भारताने यासह 151 षटकांमध्ये सर्वबाद 587 धावा केल्या.
मियाँ मॅजिक-आकाश दीपचा ‘दस का दम’त्यानंतर मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या दोघांनीच इंग्लंडचा पहिल्या डावात बाजार उठवला. सिराजने 6 आणि आकाशने 4 विकेट्स घेत इंग्लंडला 89.3 ओव्हरमध्ये 407 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे भारताला 180 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर शुबमनने दुसऱ्या डावातही धमाका केला. शुबमनने 161 धावा केल्या. तर केएल राहुल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने अर्धशतकी खेळी करत निर्णायक योगदान दिल. केएल राहुल 55, ऋषभ पंत 65 आणि रवींद्र जडेजा याने नाबाद 69 धावा केल्या. भारताने यासह दुसरा डाव हा 83 षटकांत 6 बाद 427 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या दिवशी 608 धावांचं आव्हान मिळालं.
इंग्लंडचा दुसरा डावभारताने इंग्लंडला चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 72 धावांवर 3 झटके दिले. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. त्यामुळे भारताला पाचव्या आणि अंतिम दिवशी 7 विकेट्सची गरज होती. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळाला विलंबाने सुरुवात झाली. पावसामुळे सामना अनिर्णित राहतो की काय? असं वाटत होतं. मात्र वरुणराजाने विश्रांती घेतली आणि सामना सुरु झाला.
भारताचा ऐतिहासिक विजय
A historic win at Edgbaston 🙌#TeamIndia win the second Test by 336 runs and level the series 1-1 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF #ENGvIND pic.twitter.com/UsjmXFspBE
— BCCI (@BCCI)
पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. एकट्या आकाश दीप याने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना गुंडाळलं. तर मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इंग्लंडला ऑलआऊट केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने सर्वाधिक 88 धावा केल्या. तर त्याव्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर 35 पारही पोहचता आलं नाही. भारताने हा विजय मिळवल्याने 5 सामन्यांची मालिका आता रंगतदार स्थितीत पोहचली आहे. आता 10 जुलैला होणाऱ्या तिसर्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.