भोसरी, ता. ६ ः आषाढी एकादशीनिमित्त भोसरी, दिघी आणि इंद्रायणीनगर परिसरातील मंदिरामध्ये विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली. काकडा आरती, महापूजा, भाविकांना उपवासाच्या फराळाचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.
भोसरी गावठाणातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान दिनापासूनच (ता. २०) मंदिरात दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत काकडा आरती घेण्यात आली. विठ्ठल - रखुमाई मंदिर भजनी मंडळाद्वारे ही काकडा आरती घेण्यात आली. हभप समस्त भोसरीगाव ट्रस्ट व ग्रामस्थांद्वारे दीड हजार भाविकांना उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
आळंदी - पुणे पालखी मार्गावरील वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्री पांडुरंग आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची महापूजा पार पडली. या पूजेचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका ट्रस्टच्यावतीने करण्यात आले. महापूजा, अभिषेक आणि हरिपाठाचे आयोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर आदींनी पारंपरिक विधी, भक्तिभाव जपत श्रींची महापूजा केली. श्री विठ्ठल - रुक्मिणी आणि माउलींच्या मूर्तींना दूध, दही, मध, सुगंधी जलाने अभिषेक करण्यात आला. गजर, अभिषेक, आरती आणि हरिनामाच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला दिसला. गंगाधार स्वामी महाराज यांनी कीर्तनसेवा केली. संध्याकाळी हरिपाठ आणि रत्री हरी जागर घेण्यात आला. श्रींना महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्याचे भाविकांना वाटप करण्यात आले. मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट, रांगोळ्यांनी सजविण्यात आला.
दिघीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काकडा आरती घेण्यात आली. दिघी गावातील भजनी मंडळांनी भजन सादर केले. सुरेश वामनराव वाळके, चंद्रकांत वामनराव वाळके यांनी उपस्थित भाविकांना उपवासाच्या फराळाचे वाटप केले.