शिवसेना एमएनएस अलायन्सवरील संजय राऊत: त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल 20 वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा 5 जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाली की, पाच तारखेला जो मराठी भाषेचा विजय उत्सव झाला, त्याची लोक अद्याप चर्चा करत आहेत. महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेल्या वीस वर्षांपासून वाट पाहत होती आणि तो क्षण आल्यावर आता जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी, अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसे भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाचे लोक सांगत होते की, हे दोघे एकाच व्यासपीठावर येणे शक्यच नाही. आता ते म्हणत आहेत की, युती केली तर आम्ही पाहतो, हे आव्हान परप्रांतीयांकडून नाही. कसे येतात पाहतो म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करत आहात का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तुम्ही ठाकरेंवर दबाव आणू पाहत आहेत का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही, एका विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र विजय दिवसाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीने अशी विधाने करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केले पाहिजे. पहलगाम हल्ल्याच्या अतिरेक्यांशी तुलना करणे, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असे विधान करणे, त्यांना अतिरेकी ठरवणे, हे चित्र काय सांगत आहे? सरकार आणि सरकारचे माणसांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले नकोत. त्यांना मराठी भाषा या राज्यांमध्ये अभिमानाने झळकलेली नको. त्यांना मराठीचा वैभव आणि गौरव हवा, असे वाटत नाही आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना पहलगामच्या अतिरेक्यांशी करतायेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी आशिष शेलार यांच्यावर केला.
राज ठाकरेंकडून युतीबाबतचे कुठलेही संकेत व्यक्त करण्यात आले नाहीत. तर उद्धव ठाकरे हे राजकीय युतीसाठी जास्त आग्रही होते, अशी चर्चा आता रंगली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तुम्ही राज ठाकरे यांनाच विचारायला हवं. आमच्याकडून आम्ही सातत्याने मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे. मराठी माणसाच्या मनातल्या भावना किंवा जो संताप आहे त्या संतापाला वाट करून देण्याचे काम सुद्धा आम्ही करतो. जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंबावर आणि मराठी माणसाच्या एकजूटी विषयी आहे. त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे. तीच भूमिका राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत, एकत्र आंदोलन करत आहेत. आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत. हे चित्र कालपर्यंत महाराष्ट्रात फार दुर्मिळ होतं, ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करून नये, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचा अस्तित्व काय असणार? कारण काँग्रेसने आतापासूनच स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस मराठीच्या विजयी मेळाव्यापासून दूर राहिली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे पक्ष आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो. आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे सर्व मराठी नेते आमच्या सोबतच राहणार आहे. त्यामुळे त्याची चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही. मराठीच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सगळे एकत्र आहोत, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, भाजपचा नेता मराठी भाषेसंदर्भात आंदोलन करणाऱ्यांची तुलना पहलगामच्या अतिरेक्यांशी करतो, त्यांनी दहशतवादी ठरवतो आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतात. पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा क्रांतीची ठिणगी पडते. 1857 चं बंड त्यातूनच झालं. 1978 साली आणीबाणीनंतर जी सत्ता पालट झाली, ती अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाली, रुदालीतून झाली. फडणवीसांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळात कच्चं होत आहे. त्यांना शिकवणी हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
https://www.youtube.com/watch?v=Pudlogz-xqy
आणखी वाचा
आणखी वाचा