एजबेस्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडला स्पष्ट आणि थेट असा संदेश दिला आहे. प्रत्येक सामन्यात हेडिंग्लेप्रमाणे होणार नाही, असं शुबमनने म्हटलंय. उभयसंघातील सलामीचा सामना लीड्समधील हेडिंग्ले मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला 371 धावांचं आव्हान दिल्यानंतरही पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र भारताने पहिल्या सामन्यात केलेल्या चुका सुधारल्या आणि विजय मिळवला. भारताने इंग्लंडसमोर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 271वर गुंडाळलं आणि 336 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
शुबमनने दुसऱ्या कसोटीत प्रमुख भूमिका बजावली. शुबमनने पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. शुबमनने एकूण 430 धावा केल्या. शुबमनला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. शुबमनने सामन्यानतंर मनातील भावना व्यक्त करताना पहिल्या सामन्यातील चुका सुधारल्याचं म्हटलं.
“गेल्या सामन्यातील पराभवानंतर आम्ही आमचं काय चुकलं? यावर चर्चा केली. त्यानुसार दुसऱ्या सामन्यात आम्ही त्यावर मेहनत घेतली आणि यशस्वी ठरलो. आम्ही ज्या पद्धतीने फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये सुधारणा केली ते उल्लेखनीय आहे. अशा खेळपट्टीवर 400-500 धावाही पुरेशा आहेत, हे आम्हाला माहित होतं. प्रत्येक सामना हेडिंग्लप्रमाणे होणार नाही”, असं शुबमनने म्हटलं.
“शुबमनने या सामन्यातील गोलंदाजांच्या कामगिरीसाठी कौतुक केलं. गोलंदाजांनी इंग्लंडच्या अव्वल फलंदाजांना बाद केलं आणि कडक बॉलिंग केली. प्रसिध कृष्णा याला जास्त विकेट्स मिळाल्या नाहीत. मात्र त्यानेही चांगली बॉलिंग केली”, असं शुबमनने नमूद केलं.
टीम इंडियाने शुबमनच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 587 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या जोडीने इंग्लंडला 10 झटके देत 407 धावांवर गुंडाळलं. भारताने त्यानंतर 427 धावांवर डाव घोषित केला. भारतीय गोलंदाजांनी त्यानंतर इंग्लंडला 271 धावांवर रोखलं. दुसऱ्या डावात आकाश दीप याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. आकाशने या सामन्यात एकूण 10 तर सिराजने 7 विकेट्स घेतल्या.