इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या तरुण भारतीय संघानं बर्मिंगहॅमच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
भारतानं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला तब्बल 336 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 नं बरोबरी केली आहे.
बर्मिंगहॅममध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच कसोटीमध्ये विजय मिळवला आहे.
भारत हा इथं विजय मिळवणारा आशियातील पहिला देश ठरला.
कर्णधार शुभमन गिलची विक्रमी फलंदाजी आणि सिराज आणि आकाशदीप यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हा विजय खेचून आणला आहे.
अनुभवी खेळाडुंची वानवा असलेल्या भारताच्या या तरुण संघानं केलेल्या कामगिरीनं भारतीय क्रिकेटच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे, हे दर्शवणारा हा विजय ठरला.
मालिका जिंकलो तर मोठं यश ठरेलशुभमन गिलनं सामन्यानंतर बोलताना संघातील खेळाडुंच्या कामगिरीचं कौतुक केलं.
विशेषतः गोलंदाजांचं कौतुक करताना गिल म्हणाला की, "गोलंदाजांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली. वरच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात त्यांनी यश मिळवलं हे सर्वात महत्त्वाचं होतं. आकाशदीप आणि सिराज दोघांनीही अत्यंत खास गोलंदाजी केली."
अशा खेळपट्टीवर बॉल दोन्ही बाजुला वळवणं हे सोपं नसतं. पण आकाशदीपनं अत्यंत कौशल्यानं गोलंदाजी करत ते करून दाखवलं. त्याचा आम्हाला फायदा झाला, असंही भारतीय कर्णधारानं म्हटलं.
प्रसिद्ध कृष्णाला विकेट मिळाल्या नसल्या तरी त्यानं चांगली गोलंदाजी केल्याचं गिलनं म्हटलं.
स्वतःच्या फलंदाजीवर समाधानी असल्याचं गिल म्हणाला. माझी कामगिरी संघाच्या विजयात हातभार लावण्यासाठी फायद्याची ठरली आणि आम्ही मालिका जिंकू शकलो, तर ते मोठं यश असेल असंही गिल यावेळी म्हणाला.
पहिल्या डावापासून भारताचा वरचष्मापहिल्या कसोटीत पराभवानंतर इंग्लंडचा संघ त्यांच्या बॅझबॅाल स्टाइल क्रिकेटने या सामन्यातही भारताला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला.
कदाचित त्यामुळंच टॉस जिंकूनही बेन स्टोक्सनं भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण पहिल्याच डावात भारतीय फलंदाज आणि विशेषतः कर्णधार शुभमन गिलनं इरादे स्पष्टपणे दाखवून दिले.
भारताला पहिल्या डावात सुरुवातीला लवकर विकेट गेल्यानं धक्के बसले. मात्र, त्यानंतर कर्णधार शुभमन गिलनं मैदानावर असा काही नांगर टाकला की, इंग्लंडच्या गोलंदाजांना काय करावे सुचेनासे झाले.
गिलनं 269 धावांची विक्रमी खेळी केली. त्याला यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची साथ मिळाली. त्या जोरावर पहिल्या डावात भारतानं 587 धावा केल्या.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या पहिल्या 5 फलंदाजांना भारतानं 84 धावांत परतवलं. पण हॅरी ब्रूकच्या 158 आणि जेमी स्मिथच्या 187 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 407 धावांपर्यंत टप्पा गाठला. असं असूनही भारताकडं पहिल्या डावात 180 धावांची आघाडी होती. भारताच्या सिराजनं 6 तर आकाशदीपनं 4 विकेट घेतल्या.
त्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी इंग्लंजच्या गोलंदाजांची धुलाई केली. शुभमन गिलच्या 169 धावा, पंत, जडेजा आणि राहुल यांची अर्धशतकं या जोरावर दुसऱ्या डावात 427 धावा करत इंग्लंडला तब्बल 608 धावांचं आव्हान दिलं.
बॅझबॉल खेळून चौथ्या डावात सामना जिंकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडच्या संघाचं इथं मात्र तरुण शुभमनच्या संघानं काहीही चालू दिलं नाही.
चौथ्या डावात इंग्लंडचा संघ 271 धावांवर गारद झाला आणि भारताचा 336 धावांनी विजय झाला. आकाशदीपनं 6 विकेट घेत इंग्लंच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला.
विक्रमांची कसोटीही कसोटी खऱ्या अर्थानं भारतीय संघासाठी विक्रमांची कसोटी ठरली. याकसोटीमध्ये क्रिकेट चाहत्यांना अनेक विक्रमांचे साक्षीदार होता आलं.
बर्मिंघमध्ये भारतीय संघानं मिळवलेला हा पहिला कसोटी विजय ठरला. विशेष म्हणजे बर्मिंघममध्ये विजय मिळवणारा भारत हा संपूर्ण आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे.
धावांचा विचार करता भारताचा हा कसोटीमधील सर्वात मोठा विजय ठरला. तसंच भारतीय संघानं प्रथमच एका कसोटी सामन्यामध्ये एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
शुभमननंही या सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली. एका सामन्यात दोन डावांमध्ये 200 हून अधिक आणि 150 हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
एका सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्यानं दुसरं स्थान मिळवलं. त्यानं या सामन्यात 430 धावा केल्या.
कर्णधार म्हणून 4 डावांमध्ये फलंदाजी करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शुभमन गिल ठरला. त्यानं 4 डावांत 585 धावा केल्या.
एका सामन्यात दोन शतकं करणारा शुभमन गिल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला.
या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लॉर्ड्समध्ये खेळवला जाणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.