ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला असे उत्तर मिळाले होते की, पाकिस्तान कायम लक्षात ठेवेल. खोट्या प्रचाराद्वारे पाकिस्तानने स्वत:ला या युद्धाचा विजेता घोषित केले असले तरी त्यांचे काय झाले हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. आता फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेने ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आणखी एक खुलासा केला आहे, ज्यात पाकिस्तानसह चीनचीच भूमिका दिसून येते.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, राफेल लढाऊ विमानांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने चीनने अब्रुनुकसानीचे युद्ध सुरू केले होते. अहवालात म्हटले आहे की, ही मोहीम भारत-पाकिस्तान त्यानंतर लष्करी संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूर तीव्र झाले. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘एससीओ’ क्षेपणास्त्रांनी अचूक हल्ले केले, तेव्हा फ्रान्सचे लढाऊ विमान राफेल पाकिस्तानने पाडले, तेही चिनी शस्त्रांच्या मदतीने, अशी खोटी स्टोरी चीनने जगभर मांडायला सुरुवात केली.
फ्रेंच गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, चीनने आपले दूतावास, सोशल मीडिया नेटवर्क आणि प्रॉक्सी अकाऊंटच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्या. या फेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाची राफेल विमाने उद्ध्वस्त करण्यात आली होती. दसॉल्ट एव्हिएशनने तयार केलेल्या राफेल विमानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि चिनी बनावटीच्या जे-10 लढाऊ विमानांना जागतिक बाजारपेठेत प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश होता. याचाच परिणाम म्हणजे आता इंडोनेशियासारखे संभाव्य ग्राहक देश राफेल खरेदीचा फेरविचार करत आहेत.
मात्र, चीनने फ्रान्सचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. बीजिंगने हे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भारतानेही या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल विमानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि स्काल्प क्षेपणास्त्रांनी केलेले हल्ले अचूक आणि प्रभावी होते. डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तान आणि चीनच्या मीडिया रिपोर्टला खोटे आणि दिशाभूल करणारे म्हटले आहे. ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली असून राफेलच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले
भारत-फ्रान्सचे संरक्षण सहकार्य भक्कम आहे, हे या संपूर्ण प्रकरणाने दाखवून दिले आहेच, पण जागतिक शस्त्रास्त्रबाजारात केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर प्रचार आणि माहितीयुद्धही निर्णायक भूमिका बजावत आहे, ही चिंतेची बाब आहे. या वादाचा फटका इंडोनेशिया, मलेशिया आणि अरब देशांसारख्या संभाव्य राफेल खरेदीदारांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. किमान त्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करणे भाग पडेल.