बॉलिवूड किंवा कलाविश्वातील सेलिब्रिटींची लग्न म्हटलं की अत्यंत धूमधडाक्यात पार पडलेला सोहला डोळ्यांसमोर येतो. पण असेही अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं. कुठलाही गाजावाजा न करता या कलाकारांनी सप्तपदी घेतली. अशाच एका दिग्गज अभिनेत्याने फक्त 750 रुपयांमध्ये लग्न केलंय. हा आकडा वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना? याचा खुलासा खुद्द त्या अभिनेत्याने केला आहे. हे अभिनेते दुसरे-तिसरे कोणी नसून नाना पाटेकर आहेत. आपल्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकरांनी अत्यंत माफक पैशांमध्ये लग्न केलंय.
1 जानेवारी 1951 रोजी जन्मलेल्या नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये लग्न केलं. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केलं. नीलकांती यासुद्धा अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. आपल्या लग्नाबद्दल नाना एका मुलाखतीत म्हणाले, “मी आधी लग्नाचा विचारसुद्धा केला नव्हता. परंतु नीलूला (नीलकांती) भेटल्यावर माझं मत बदललं. तिच्याशी माझी पहिली भेट रंगभूमीवरच झाली होती. तो सत्तरचा दशक होता. तेव्हा फक्त 200 रुपयांमध्ये घरातील राशन यायचं. आम्ही आमच्या लग्नात फक्त 750 रुपये खर्च केले होते.”
नाना पाटेकर यांच्या पत्नी आधी बँकेत काम करायच्या. त्यावेळी त्यांना दर महिन्याला अडीच हजार रुपये पगार मिळत होता. तेव्हा नाना विविध नाटकांच्या प्रयोगांमधून कमाई करायचे. या दोघांनी 750 रुपयांमध्ये लग्न केल्यानंतर पाहुण्यांना गोल्ड स्पॉट्सची (सॉफ्ट ड्रिंक) एक छोटीशी पार्टी दिली होती. यामध्येही फक्त 24 रुपयांचा खर्च आला होता.
नाना अशा कलाकारांपैकी एक आहेत की ज्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाचीही मदत घेतली नाही. अडचणी आणि परिस्थितीवर मात करून नानांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं. अडचणी आणि परिस्थिती हेच त्यांचे खरे सहकारी आणि शिक्षक बनले. नाना पाटेकर यांच्या फिल्मी करिअरमध्ये जशा सुरुवातीला अडचणी आल्या. त्यापेक्षा अधिक अडचणी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आल्या होत्या. त्यावर मात करत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.