मानवी हक्क आयोगाची जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
शहापूर तालुक्यातील रुग्णांचा डोलीतून प्रवास
शहापूर, ता. ७ (वार्ताहर) : शहापूर तालुक्याच्या आदिवासीबहुल, दुर्गम व ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या अद्यापही सुस्थितीतल्या रस्त्यांशी जोडला गेलेला नाही. त्यामुळे वाड्या-वस्त्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचे सुविधांअभावी हाल होत आहेत. रस्ते नसल्याने पायवाटांचा वापर करावा लागत आहे. वस्तीतून पंचक्रोशीतील बाजारपेठेत अथवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्भवती महिला आणि आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी डोली बनवून त्यातून न्यावे लागत आहे. शहापूर तालुक्यातील आदिवासी रुग्णांच्या रस्त्यांअभावी याच डोलीतील प्रवासाची आता थेट मानवी हक्क आयोगाने नोंद घेतली आहे. आयोगाने या परिस्थितीची ठाणे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून विचारणा केली आहे.
शहापूर तालुक्यातील सुमारे २०० हून अधिक वाड्या-वस्त्यांना शहरांशी, जवळच्या बाजारपेठांशी तसेच महसुली गावांशी जोडण्यासाठी सुस्थितीतील रस्ते नाहीत. या वाड्यावस्त्यांमधील आदिवासी डोंगर, दऱ्यांमधील पायवाटांचाच वापर करीत आहेत. थेट वाड्या-वस्त्यांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचल्या नसल्याने येथील रुग्णांना शहरातील रुग्णालयांशिवाय पर्याय उपलब्ध नाही. अशावेळी पूर आलेल्या नदीतून अथवा ओढ्यातून वाट काढत तर कधी चढ-उताराच्या खाचखळग्यांतील पायवाटेने चादरीची डोली करून रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. दरवर्षीच्या पावसाळ्याच्या दिवसांत रुग्ण रुग्णालयात नेण्यासाठी डोलीचा आधार घ्यावा लागतो. यंदादेखील येथील रस्ते नसलेल्या वाड्यावस्त्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.
१७ सप्टेंबरला सुनावणी
आता या परिस्थितीची थेट मानवी हक्क आयोगाने नोंद घेतली आहे. आयोगाने ठाणे जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. शहापूर तालुक्यातील या परिस्थितीचा खुलासा करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी येणाऱ्या १७ सप्टेंबरला सुनावणीदेखील घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष ए. एम. बदर यांनी सांगितले. सध्याच्या आधुनिक युगातही वाड्यावस्त्यांना रस्ते नाहीत, रुग्णांना डोलीतून न्यावे लागते. याबाबत आयोगाने बजावलेल्या नोटिसीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.