3,43,00,000 रुपये बँक खात्यात जमा झाले! साध्या रिसेप्शनिस्टचे नशीब चमकलं… पण 11 महिन्यानंतर… घडलं तरी काय?
Tv9 Marathi July 08, 2025 12:45 AM

कुणाचं नशीब कधी उघडेल हे सांगता येत नाही. जरा विचार करा… तुमचा पगार 30 हजार रुपये आहे. आणि एक दिवस अचानक तुमच्या अकाऊंटमध्ये कोट्यवधी रुपये आले तर तुम्ही काय कराल? एवढा पैसा पाहून तुम्ही आनंदाने पागलच व्हाल. बरोबर ना? एका 29 वर्षीय महिलेच्याबाबत असंच काही तरी घडलंय. येसिका अरुआ असं या महिलेचं नाव. ती फ्लोरिडाच्या घोड्याच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. तिच्या अकाऊंटमध्ये एक दिवस अचानक कोट्यवधी रुपये आले आणि…

2022 मध्ये ही घटना घडलीय. पण या घटनेची आजही चर्चा होतेय. एके दिवशी येसिकाला तिच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला. येसिकाचा पगार खरं तर 50 हजाराच्या आसपास आहे. पण तिच्या अकाऊंटमध्ये अधिक पैसे आले. मेसेज वाचल्यावर तिला धक्का बसला. एवढे पैसे? मला कोणी पाठवले? असा सवाल तिच्या मनात आला. कदाचित हा कुठला तरी बोनस असेल असं तिला वाटलं. क्लिनिकमध्ये जुन्या रिसेप्शनीस्टला चांगलं काम केल्यावर बोनस मिळतोय अशी अफवा होती. तिला वाटलं कदाचित तो हाच बोनस असेल. तिने या रकमेबाबत ना बॉसला विचारलं, ना कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारलं.

वाचा: मला एक पप्पी दे, हवं ते देतो; पुण्यात 73 वर्षीय थेरड्याकडून तरुणीचा विनयभंग

3 कोटी 43 लाख रुपये आले

दर महिन्याला तिच्या खात्यात पगारापेक्षा जास्त पैसे येऊ लागले. फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत येसिकाला सुमारे 34.3 दशलक्ष रुपये (सुमारे $400,000) मिळाले. या पैशाने येसिका तिचे छंद पूर्ण करायची. तिने नवीन फर्निचर विकत घेतले, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ लागली आणि नवीन घरही विकत घेतले. एवढेच नव्हे तर तिने तिचा मामा ड्यूक्स याला हजारो डॉलर्स ऑनलाइन हस्तांतरित केले. ती एवढ्यावरच थांबली नाही. तिने आईच्या एका मित्रासाठी 66 लाख रुपयांचा फूड ट्रक खरेदी केला. अर्जेंटिनामधील त्याच्या कुटुंबाला तिथे घर खरेदी करण्यासाठी लाखो रुपयेही पाठवले. पण आता प्रश्न उद्भवतो की, तिला इतके पैसे कुठून मिळाले?

डॉक्टरांचे पैसे…

ती सुमारे 11 महिने या पैशाचा वापर करत होती. प्रश्न नाहीत, चिंता नाही. एके दिवशी येसिकाच्या क्लिनिकच्या डॉक्टरांनी एक ट्रँजेक्शन केलं, अचानक हे ट्रँजेक्शन रद्द झालं. जेव्हा डॉक्टरने त्याच्या बँक खात्याची तपासणी केली तेव्हा त्याला आढळले की, गेल्या कित्येक महिन्यापासून त्याचा पगार आलेला नाही. डॉक्टरने लगेचचं रुग्णालयाच्या डायरेक्टरशी संपर्क साधला. संचालकांनी सर्व खाती तपासण्यास सुरुवात केली. तपासात असे उघड झाले की, डॉक्टरचा पगार, जो दरवर्षी सुमारे 3 कोटी 73 लाख रुपये होता, तो चुकून येसिकाच्या खात्यात जात होता. हा प्रकार उघड झाल्याने रुग्णालयाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

अटक..

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून येसिकाला 27 जून 2023 रोजी अटक केली. पैसे कुठे गेले असा सवाल पोलिसांनी तिला केला. तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. ती म्हणाली की, खात्यात अधिक पैसे येत आहेत हे मला माहीत होते, परंतु तो बोनस आहे असे मला वाटले. पूर्वीच्या रिसेप्शनिस्टला पुरवठ्यावर पैसे वाचवल्याबद्दल बोनस मिळाला होता, म्हणून मी जास्त प्रश्न विचारले नाहीत, असं ती म्हणाली. एव्हाना यसिकाने या पैशाने केवळ तिचे छंदच पूर्ण केले नाहीत तर तिच्या कुटुंबाला लाखो रुपयेही पाठवले. तिेने तिच्या आईच्या मित्रासाठी खाद्यपदार्थांचा ट्रक विकत घेतला आणि अर्जेंटिनामध्ये घर खरेदी करण्यासाठी पैसे पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चूक स्वीकारली

येसिकाने आपली चूक मान्य केली आणि लगेच धनादेशाद्वारे 1 कोटी 66 लाख रुपये परत केले. पण बाकीचे पैसे? तिने सांगितले की, तिच्या आईने सुमारे 83 लाख रुपये अर्जेंटिनाला पाठवले होते आणि उर्वरित पैसे तिने खर्च केले होते. आता ती उर्वरित रक्कम परत करण्याच्या स्थितीत नव्हती. येसिकावर क्लिनिकमधून चोरी आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला होता. तिला फ्लोरिडातील पाम बीच मुख्य स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.