नवी मुंबईचं विमानतळ नेमकं कधी कार्यान्वित होणार? तारीख आली समोर!
Tv9 Marathi July 08, 2025 12:45 AM

Navi Mumbai Airport : नवी मुंबईतील विमानतळाचे काम पूर्ण होत आले आहे. आता लवकरच हे विमानतळ कार्यान्वित होणार असून त्याआधी त्याचा भव्य असा उद्घाटन समारोह होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे विमानतळ कधी चालू होईल, असे विचारले जात आहे. असे असतानाच आता मंत्री उदय सामंत यांनीच थेट हे विमानतळ कधी कार्यान्वित होईल, याबाबत सांगितले आहे. ते विधानसभेत बोलत होते.

नवी मुंबईचे विमानतळ कधी कार्यान्वित होणार?

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. यावेळी विधानसभेत मुंबई विमानतळाबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवी मुंबईचे विमानतळ कार्यान्वित होईल, असे सामंत यांनी सांगितले.

आमदारांनी केली होती विमानतळाची पाहणी

याआधी विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनीदेखील या विमानतळाबाबत प्रतिक्रिया दिली होती. 25 जून रोजी राहुल कुल, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली होती. सध्या विमानतळाचं काम सुरू आहे. त्यामुळे विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणी केली. यावेळी बोलताना राहुल कुल माहिती देताना म्हणाले की सप्टेंबरमध्ये विमानतळाचं काम पूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळाच्या नावा संदर्भातील अंतिम निर्णय हा शासन स्तरावर होईल. तर सप्टेंबर अखेरपर्यंत विमानतळाचं काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले होते.

विमानतळाचा होणार संपूर्ण महाराष्ट्राला फायदा

नवी मुंबईच्या विमानतळामुळे मुंबईत येणे आणखी सोपे होणार आहे. या विमानतळाला बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हीटी असणार आहे. तसेच एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाचीही कनेक्टिव्हीटी विमानतळाला असेल. या विमानतळामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे तसेच इतर महत्त्वाच्या शहरांना होणार आहे.

दरम्यान, मुंबईत रोज हजारो लोक येतात आणि तेवढेच लोक मुंबईच्या बाहेर पडतात. बरेच प्रवासी हे विमानाने प्रवास करतात. त्यामुळेच सध्या मुंबईत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) खूप मोठा भार आहे. हाच भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईच्या विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.