Property Tax : पुणे महापालिकेच्या तिजोरीत १४०० कोटीचा कर जमा
esakal July 08, 2025 02:45 AM

पुणे - नागरिकांनी मिळकतकर भरून महापालिकेच्या विकास कामांना हातभार लावावा यासाठी गेले दोन महिने निवासी मिळकतकरावर ५ ते १० टक्के सवलत देण्यात आली होती. आज (ता.७) अखेरच्या दिवशी सायंकाळी सात पर्यंत ७ लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी १४११ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३ हजार ३७६ नागरिकांनी कर भरणा केलेला नाही. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्नाला आहोटी लागली आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत निवासी मिळकतकरावर ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. पण यंदा समाविष्ट गावांमधील व ४० टक्के सवलतीसह मिळकतकराची बिले तयार होण्यास विलंब लागल्याने या योजनेची मुदत १ मे ते ३० जून या दरम्यान होती.

पण शेवटच्या दिवशी महापालिकेचे सर्व्हर ठप्प झाल्याने या योजनेची मुदत ७ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सात पर्यंत ७ लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी १हजार ४११ कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन कर भरणा करणे शक्य असल्याने यामध्ये आणखी भर पडणार आहे,

अशी माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी दिली. गेल्यावर्षी ७ जुलैपर्यंत ७ लाख ७८ हजार ५१६ नागरिकांनी १ हजार ४१५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर जमा केला होता. यंदाच्या वर्षी सायंकाळी सातपर्यंत १ हजार ४११ कोटी रुपये जमा झाले आहेत. रात्री १२ पर्यंत ही मुदत असल्याने गेल्यवर्षी ऐवढाच कर जमा होण्याची शक्यता आहे.

३ हजारपेक्षा जास्त मिळतकधारकांनी फिरवली पाठ

महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५ ते १० टक्के सवलत घेणाऱ्या नागरिकांची संख्या ३ हजार ३७६ इतकी कमी झाली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका महापालिकेला बसला आहे.

शहरात नव्याने होणारी मिळकतकर आकारणी, ४० टक्के सवलत पुन्हा प्रदान करणे, थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविणे यातून प्रशासनाकडून कर वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण पहिल्या दोन महिन्यात सव्वा तीन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे टाळले आहे. या नागरिकांनी कर भरणा करण्याकडे पाठ का फिरवली याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

समाविष्ट गावातून २३२ कोटी

समाविष्ट गावातून किती मिळकतकर आकारणी करायचा याचा निर्णय अजून राज्य सरकारने घेतलेला नाही, त्यामुळे तेथील कर आकारणी वसुली बंद आहे. पण येथील १ लाख ७४ हजार मिळतकधारकांनी ऑनलाइन बिल तपासून त्यानुसार २३२ कोटी रुपयांचा कर भरला आहे.

थकबाकीची रक्कम वाढत गेल्यास व राज्य शासनाकडून कोणतीही सवलत न मिळाल्यास भविष्यात मोठी रक्कम भरण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते. त्यामुळे नागरिक स्वतःहून कर भरणा करण्यासाठी पुढे आले आहेत.

१ एप्रिल ते ७ जुलैपर्यंत जमा झालेला मिळतकर

वर्ष - कर भरणारे मिळतकधारक - जमा झालेला कर

२०२४ - ७,७८,५१६ - १४१५. ६५कोटी

२०२५ - ७,७५,१४० - १४११.०१ कोटी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.